समाज जेव्हा कर्मकांडाने ग्रस्त होता त्यावेळी आत्मिक उन्नतीचा मार्ग महानुभाव पंथाने दाखविला. चक्रधर स्वामींनी त्यावर कळस चढविला. या विचारांचा अभ्यास करता यावा म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महानुभाव अध्यासन केंद्र सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडण़वीस यांनी रविवारी दिली. त्याचबरोबर महानुभाव पंथीयांच्या तीर्थस्थळांचा विकास आणि त्याला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ देण्याची घोषणाही त्यांनी केली.

मौदा येथील महानुभाव पंथींयांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थिथ होते. लीळाचरित्र हे मराठीतील आद्य काव्यग्रंथ आहे. या ग्रंथाची निर्मिती विदर्भात झाल्याने मराठी ही सदैव या महानुभाव पंथांची ऋणी राहील. विचार प्रवाहाच्या ग्रंथाची निर्मिती रिद्धपूर येथे झाली. या ग्रंथाने पंथाला समृद्ध केले. हा विचार अभ्यासकांना अभ्यासता यावा म्हणून नागपूर विद्यापीठात अध्यासन केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही शासनाने सुरू केली आहे. लोकांमध्ये भाषा व विचार रुजविण्याचे काम चक्रधर स्वामींनी केले. त्यांचा जास्तीत जास्त अधिवास विदर्भातच होता. त्यामुळे या सर्व तीर्थस्थळांचा विकास करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

[jwplayer 1LbUYUP3]

महानुभाव पंथाचे धर्मस्थळ विकसित करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. मौद्या येथील धार्मिक स्थळाला जाण्यासाठी ५८ लाख रुपयांचा सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्य़ातील सर्व धार्मिकस्थळांचा विकासासाठी ५ कोटींचा आराखडा तयार करणे सुरू आहे, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यावेळी गोपीनाथबाबा, बाबा अनिल साहणी, बाळासाहेब मेहत्रे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार नानाभाऊ पटोले, आमदार परिणय फुके, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष गोपीनाथबाबा, नांदगावकरबाबा, विश्वनाथबाबा, महंत राहरेकरबाबा, बाभूळगावकरबाबा, तसेच अनेक मंहत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

महानुभाव पंथीयांच्या मागण्या

  • रिद्धपूरला मराठी विद्यापीठ स्थापन करावे.
  • विद्यापीठात चक्रधर प्रभू अध्यासन केंद्र सुरू करावे.
  • जिल्ह्य़ातील तीर्थक्षेत्रांचा विकास करावा.

[jwplayer a5j3Q5rm]