भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा सैनिकाची भूमिका बजावत असतो. सैन्याला ज्याप्रमाणे नियमित सरावाची गरज असते, त्याप्रमाणे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी आणि मेळाव्याच्या माध्यमातून सराव सुरू असतो. ६ एप्रिलला मुंबईमध्ये होणारा पक्षाचा स्थापना दिनाचा कार्यक्रम आगामी लढाईचा सराव असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे आवाहन केले.

आगामी लोकसभा निवडणुका आणि गेल्या तीन वर्षांत देशभरात विविध राज्यात पक्षाला मिळालेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी स्थापना दिनाच्या निमित्ताने मुंबईला ६ एप्रिल रोजी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या तयारीच्या निमित्ताने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पूर्व विदर्भातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. भाजपची स्थापना ६ एप्रिलला झाली होती. ज्यावेळी अनेक राज्यात भाजपचे अस्तित्व नव्हते, आज अशा अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. सर्वात जास्त नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच भाजपचे आहेत. मुंबई येथे पक्षाची स्थापना करण्यात आली असून त्या ठिकाणी स्थापनेचा सोहळा करण्यात आला होता. शून्यापासून सुरुवात करणारा हा पक्ष प्रत्येक पाच वर्षांत वाढत गेला. आज देशातील मोठा आणि जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेल्या पक्ष म्हणून भाजपने ओळख निर्माण केली आहे. देशातील एक फोर्स म्हणून भाजप स्थापित झाला आहे. कोणत्याही सैन्याला सातत्याने सराव करावा लागतो. भाजपमधील कार्यकर्तारूपी सैन्याचाही सातत्याने सराव सुरू असतो. मुंबई येथे होणारा कार्यक्रम हा देखील आगामी लढाईचा सराव आहे. या कार्यक्रमातून भाजपचे विराट दर्शन देशाला आणि जगाला घडवायचे आहे. त्यासाठी मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांनी मुंबईला यावे. प्रत्येक बुथवरून किमान १० कार्यकर्ते यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजवर तलाव पाहिले आहे. आता पक्ष संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या विराट सागराचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येकाने ६ एप्रिलला मुंबईत यावे, अशी सादही त्यांनी घातली. कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, अशोक नेते, रामदास तडस, आमदार मिलिंद, माने, अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, नाना शामकुळे आदी पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ज्या राज्यात अस्तित्व नव्हते अशा त्रिपुरा, मेघालय आसाम साररख्या राज्यात भाजपने अभूतपूर्व यश मिळवले. गेल्या पाच वर्षांच्या काळात ८० टक्के निवडणुका भाजपने जिंकल्या. नुकत्याच पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा संपली, असे काही प्रसार माध्यमांनी सांगणे सुरू केले. भाजपचा विजयाचा रथ कोणीच रोखू शकणार नाही, असा दावा करीत मुख्यमंत्र्यांनी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे स्पष्ट संकेत दिले.