स्वत:च्या मालकी हक्काची जमीन असणे ही जीवनात अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे शहरातील एका लाख झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

जरीपटका येथील संत लहानूजी नगरमधील नागपूर सुधार प्रन्यासच्या मैदानावर झोपडपट्टीवासीयांना कस्तुरबा नगर व इंदिरा नगर येथील मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार  उपस्थित होते. सामान्य माणसाचा सर्वात मोठा अधिकार म्हणजे त्याच्या मालकीची जमीन असणे. ज्यांच्याकडे जमिनीचा तुकडाही नाही तो अस्तित्वहीन समजला जातो. उत्तर नागपुरातील झोपडपट्टीधारक मालकी हक्काच्या पट्टय़ापासून वंचित राहिले होते. आज त्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले. नागपूर सुधार प्रन्यासच्या जमिनीवर ५२  झोपडपट्टय़ा आहे. त्यातील ४०  झोपडपट्टय़ांमधील पट्टे वाटप येत्या तीन महिन्यात करण्यात येईल. उर्वरित दहा झोपडपट्टय़ांना मालकी हक्काच्या पट्टे वाटपाची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वर्षांनुवर्षे शासकीय तसेच नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर राहत असलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क देण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. मुख्यमंत्र्यांनी मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी निर्णय घेऊन शहरातील नागरिकांना त्यांच्या जागेचा मालकी हक्क मिळवून दिला आहे, असे गडकरी म्हणाले.

यावेळी सिंधी समाज बांधवांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. ७० वर्षांपासून येथे आलेल्या सिंधी बांधवांना ते राहत असलेल्या जागेवर मालकी हक्क देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. यावेळी झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले.