तंत्रज्ञानावर आधारित संशोधनात्मक उद्योगांना चालना

आधुनिक तंत्रज्ञानावरील संशोधनावर आधारित उद्योग निर्मितीसाठी नागपूरसह १२ जिल्ह्य़ांत स्टार्टअप इको सिस्टम उभारण्यात येईल. त्यातून तरुणांना मोठय़ा प्रमाणावर रोजगार मिळेल. स्टार्टअप इको सिस्टममधून तरुणांना नवीन उद्योग उभारणीचे मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार निर्मिती इतर बाबतीत मदत केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फॉच्र्युन फाऊंडेशनच्या यूथ इम्पॉवरमेंट समिटच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार, आमदार अनिल सोले, नागो गाणार, सुधाकर देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, प्रा. कुणाल पडोळे, अनुप कुमार, सचिन कुर्वे उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगाच्या डिजिटल अर्थव्यवस्था जास्त गतीने वाढली आहे. तरुणांच्या नव्या संशोधनांनाही डिजिटल उद्योगांत बदलून राज्याची औद्योगिक प्रगती करून रोजगार निर्मिती शक्य आहे. त्यासाठी नागपूरसह राज्यातील १२ जिल्ह्य़ांत स्टार्टअप इको सिस्टम उभारणार आहे. या प्रणालीत शासनाकडून नवीन तरुणांना डिजिटल उद्योग सुरू करण्यासाठी मदत केली जाईल. जगभरात आर्थिक मंदीमुळे जीडीपी फार कमी आहे, परंतु भारतात मात्र सात टक्के तर राज्यात तो ९.५० टक्केच्या जवळपास आहे. त्यामुळे देश व राज्य चांगली प्रगती करत असल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या ४०० बिलीयन डॉलरची असून ती सध्याच्या विकासदराने वाढत गेल्यास २०२९ पर्यंत एक ट्रिलीयन डॉलर होण्याची शक्यता आहे, परंतु शासनाने विविध पावले उचलत २०२५ पर्यंत अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्याचे प्रयत्न सुरू केला आहे. जगात एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेले सध्या केवळ १२ राज्य आहेत. नागपूर- मुंबई समृद्धी मार्गाचेही काम १ ते २ महिन्यात सुरू होणार असून या मार्गाने राज्याचा सर्व भाग मुंबईशी जोडला जाईल. या मार्गाने दळणवळणाची सुविधा वाढून शहर व गाव पोर्टशी जुडून राज्यात उद्योग वाढीस मदत होईल. अमरावतीप्रमाणे नागपूर, वर्धा, यवतमाळ येथेही टेक्सटाईल पार्क उभारणार असल्याचे फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले.

एरोस्पेस पार्कमध्ये रोजगारासाठी टाटाच्या मदतीने प्रशिक्षण

देशाचा सर्वाधिक खर्च सैन्याकरिता शस्त्र व त्यांच्याशी संबंधित विविध वस्तूंच्या खरेदीवर होतो. देशात फार कमी सैन्याशी संबंधित वस्तूंची निर्मिती होत असल्याने हा सर्व पैसा विदेशात जातो. केंद्राने शस्त्रखरेदी करताना विविध कंपन्यांना किमान ३० टक्के भाग देशात उत्पादित करण्याची अट घातली आहे. त्यामुळे फ्रान्सची राफेल विमान तयार करणारी कंपनी नागपुरात रिलायन्सच्या मदतीने प्रकल्प उभारत आहे. हा प्रकल्प होणाऱ्या एरोस्पेस पार्कमध्ये इतरही डिफेन्सशी संबंधित कंपन्या येणार असून त्याने लाखो रोजगार निर्माण होतील. येथे रोजगार मिळावे म्हणून शासन टाटाच्या मदतीने ३०० कोटी रुपये गुंतवून तरुणांना प्रशिक्षण उपलब्ध करेल. त्यामुळे येथे तरुणांना रोजगार मिळण्याची आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.