News Flash

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेस धक्कातंत्राच्या तयारीत

दुसरीकडे या मतदारसंघात एकतर्फी निवडणूक व्हावी म्हणून भाजप प्रयत्नशील  आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भाजप मात्र एकतर्फी विजयाच्या प्रयत्नात

दक्षिण-पश्चिम या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात निवडणूक चुरशीची व्हावी म्हणून काँग्रेसकडून उमेदवार देताना धक्कातंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता पक्षातील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे या मतदारसंघात एकतर्फी निवडणूक व्हावी म्हणून भाजप प्रयत्नशील  आहे.

दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून फडणवीस दोनवेळा मोठय़ा मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. लोकसभेतही या मतदारसंघातून भाजपला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे यावेळी फडणवीस यांना येथील निवडणूक सोपी आहे, असा विश्वास भाजप वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेसने मात्र येथून प्रबळ उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. पक्षातील सर्व गटांना चालेल अशा व सर्वच बाजूने भक्कम असणाऱ्या नावाच्या शोधात सध्या काँग्रेस आहे. ही निवडणूक चुरशीची व्हावी, भाजप समजत तशी एकतर्फी होऊ नये हा या मागचा उद्देश आहे. त्यामुळे हे नाव नेमके कोणते असेल याबाबत सध्या राजकीय वर्तुळात  चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने अशाच प्रकारची खेळी खेळली होती. शहर काँग्रेसमधील गटबाजी लक्षात घेता गडकरींच्या विरोधात कोण उमेवार असेल अशी चर्चा सुरू असतानाच पक्षाने भंडाऱ्याचे नाना पटोले यांना गडकरी यांच्या विरोधात उभे केले होते. पटोले यांची उमेदवारी भाजपला घाम फोडणारी ठरली होती. याहीवेळी मुख्यमंत्र्यांविरोधात लढण्यासाठी तीन-चार नावांवर चर्चा सुरू आहे. यामध्ये पुन्हा नाना पटोले आहेतच. यासंदर्भात पटोले म्हणाले, पक्षाने सांगितल्यास आपण कुठूनही लढण्यास तयार आहोत. माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांचेही नाव चर्चेत आहे. देशमुख यांचे वडील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख पश्चिममधून फडणवीस याच्या विरोधात लढले होते. तेव्हा दक्षिण-पश्चिम हा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. आता पश्चिमचा काही भाग दक्षिण-पश्चिममध्ये आहे. रणजीतबाबूंचे जुने नेटवर्क अजूनही  कार्यरत आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी रविवारी शहर काँग्रेस कार्यालयाला भेट देऊन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू आणि लोकनायक बापूजी अणे यांच्या भेटीचे छायाचित्र  भेट दिले. निवडणुकीच्या तोंडावर अणे काँग्रेस कार्यालयात गेल्याने त्यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अणे यांनी आपण कुठूनही निवडणूक लढणार नाही, असे लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.  निवडणुक लढायची असती तर नितीन गडकरींविरोधात लढलो असतो. आमचा पक्ष विदर्भात पाच जागांवर निवडणूक लढणार आहे. इतर जागा महामंचच्या घटक पक्षांकडे राहणार आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. फडणवीस यांच्या विरोधात आणखी दोन नाव ‘डार्क हॉर्स’ म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसच्या एका माजी मंत्र्यांनी सांगितले.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसला तगडा उमेदवार मिळू नये, असे प्रयत्न भाजपचे आहेत. २०१४ मध्ये फडणवीस यांच्या विरुद्ध लढणारे प्रफुल्ल गुढधे यांनी यावेळी पक्षाकडे उमेदवारीच मागितली नाही. ज्यांनी उमेदवारी मागितली ते तुल्यबळ नाहीत. त्यामुळेच ही लढत एकतर्फी होईल, असे चित्र भाजपने निर्माण केले आहे. त्याला काँग्रेसच्या या खेळीमुळे तडा जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शहरातील इतर मतदारसंघातून उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच आहे. पश्चिम नागपुरातुन शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. येथून नरेंद्र जिचकार यांनी देखील उमेदवारी मागितली आहे. दक्षिण नागपुरातून गिरीश पांडव, अतुल पांडे आणि विशाल मुत्तेमवार इच्छुक आहेत. आपण तयारी सुरू केल्याचे मुत्तेमवार यांनी सांगितले. पूर्व नागपुरातून अ‍ॅड. अभिजित वंजारी आणि उमाकांत अग्निहोत्री, मध्य नागपुरातून अ‍ॅड. नंदा पराते, अ‍ॅड. आसिफ कुरेशी आणि नगरसेवक रमेश पुणेकर यांनी उमेदवारी मागितली आहे. उत्तर नागपुरातून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची दावेदारी पक्की समजली जात आहे. येथे नगरसेवक संदीप सहारे देखील इच्छुक आहेत.

बुद्धिजीवींच्या भेटी गाठी

माजी मंत्री नितीन राऊत यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच आंबेडकरी समाजातील बुद्धिजीवींच्या भेटगाठी सुरू केल्या आहेत. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना सोबत घेऊन ते भाऊ लोखंडे, ताराचंद खांडेकर आणि यशवंत मनोहर यांच्या भेटीला गेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 2:49 am

Web Title: devendra fadnavis congress bjp akp 94
Next Stories
1 दोन आठवडय़ात कुठे कुठे फिरणार?
2 महापौर, आयुक्तांविरुद्ध पोलीस तक्रार
3 मेडिकलमध्ये मद्य मैफिली जोरात!
Just Now!
X