मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत स्पष्टीकरण
ठाणे येथील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी कायदेशीर बाबी तपासूनच मोक्का लावू. मात्र, सध्या तरी या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची गरज नाही. ठाण्याचे पोलीस आयुक्त आणि सहपोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली योग्य तपास सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर, अनिल गोटे आणि इतर आमदारांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती.
ठाणे येथील कॉसमॉस ग्रुपचे प्रमुख सुरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी महापालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधींनी त्रास दिल्याचे ‘सुसाईडल नोट’मध्ये नमूद केले होते. याप्रकरणी ठाण्यातील गोल्डन गँगचा समावेश असल्याची शक्यता, परमार यांच्या हस्ताक्षरातील डायरी, भ्रमणध्वनीवर संपर्क क्रमांकाची चौकशी करण्यासंबंधीची लक्षवेधी उपस्थित केली होती.
परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, हनुमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला या चारही नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. नजीब मुल्ला यांच्या खात्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात १.७ कोटी रुपये जमा झालेले असून या व्यवहाराचा परमार यांच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का, याची चौकशी करावी लागेल, असे अ‍ॅड. राजा ठाकरे यांनी न्यायालयात सांगितले होते. मात्र, आव्हाड यांचे नाव उच्चारण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बरीच टाळाटाळ केल्याने भाजप आमदारांनी मोठा गलका केला.
आव्हाड यांच्याविरोधात मोक्का लावणार का आणि विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) स्थापन करणार काय?, अशी विचारणा अनिल गोटे यांनी केली होती. मात्र, संघटित गुन्हेगारीसंदर्भात कुठलाही गुन्हा आव्हाड यांच्या विरोधात नोंदवला गेला नसून पोलीस आयुक्त आणि सह पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली योग्य तपास सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दीड-एक वर्षांपासून लिहिली गेलेल्या परमार यांच्या डायरीतील संकेतात्मक भाषेचा अर्थ लावणे, अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या नावांचा खुलासा करून त्यांचा आत्महत्येशी काही संबंध आहे काय, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणात गुंतलेल्या गोल्डन गँगचेच काय पण इतर स्टील, कॉपर किंवा गँगचेही कंबरडेमोडले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.