News Flash

नागपूर भाजपमध्ये उमेदवारीवरून घोळ

फडणवीस-गडकरी शहरात दाखल; यादीवर एकमत होणे कठीण

फडणवीस-गडकरी शहरात दाखल; यादीवर एकमत होणे कठीण

नागपूरमध्ये भाजप उमेदवार यादीचा घोळ आता चांगलाच विकोपाला गेला असून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुंबई-दिल्ली सोडून नागपुरात यावे लागले आहे. या दोन नेत्यांच्या दीर्घ बैठकीनंतरही सायंकाळपर्यंत यादीवर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. १५१ जागांपैकी अनेक जागांवर उमेदवाराबाबत एकमत होत नसल्याने यादी लांबली आहे. त्यामुळे भाजपमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया पक्षाने एक महिनाआधीपासून सुरू केली आहे. प्रत्येक आमदाराकडून नावे मागविण्यात आली, इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून काही नावे निवडण्यात आली. एका प्रभागातील चार जागांसाठी २० नावे निश्चित करण्यात आली. मात्र यातून अंतिम चार नावे ठरविण्यासाठी गत आठ दिवसांपासून पक्षपातळीवर गोंधळ सुरू आहे. गडकरी-फडणवीस निर्णय घेतील असे सांगून स्थानिक नेत्यांनी अंग काढून घेतले. उमेदवारी दाखल करण्याची मुदत दोन दिवसांवर आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दुपारी मुंबईहून नागपुरात दाखल झाले. गडकरी गोव्यातून नागपुरात येणार होते. गडकरी यांना येण्यास विलंब झाल्याने फडणवीस यांनी रामगिरीवर बैठक घेऊन यादीवरून निर्माण झालेले वाद मिटवण्याचे प्रयत्न केले; मात्र त्यानंतरही काही प्रभागांच्या बाबत अंतिम निर्णय होऊ शकले नाहीत. गुरुवारी सकाळी पुन्हा  मुख्यमंत्री आणि गडकरी यांची गडकरी यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ बैठक झाली. यावेळी निवडणूक प्रभारी अनिल सोले उपस्थित होते. मात्र या बैठकीनंतरही यादी अंतिम झाली नाही. भाजपमध्ये प्रथमच यादीचा असा घोळ सुरू आहे. शहरातील सहाही आमदारांनी त्यांच्या समर्थकांसाठी मोर्चेबांधणी केली आहे.

दुसरीकडे तीनपेक्षा जास्त वेळ निवडून आलेल्यांना उमेदवारी नाकारण्याचा निर्णय  पक्षाने घेतला असला तरी यापैकी काहींनी बंड करण्याचा इशारा दिला आहे. संघ स्वयंसेवकही इच्छुक आहेत. त्यामुळे यादीला मूर्त रूप मिळत नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापौर प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नरेंद्र बोरकर यांच्या प्रभागात उमेदवारीवरून वाद आहे. दटके यांच्या प्रभागात दोन जागांपैकी एक खुल्या प्रवर्गासाठी व एक ओबीसीसाठी राखीव आहे. सध्या या प्रभागाचे नेतृत्व दटके आणि बंडू राऊत करीत आहेत. दोघेही ओबीसी आहेत. यापैकी एकालाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र दोघांनीही दावे केले आहेत. दयाशंकर तिवारी यांच्या जागेवर पक्षातील इतरांनी दावे केले आहेत. त्यांना उमेदवारी देऊ नये अशी पक्षातूनच मागणी होत आहे.

संघ मुख्यालयातील उमेदवारीचा वाद

भाजपचे नगरसेवक अनिल धावडे यांच्या प्रभागात आता संघ मुख्यालय वस्तीचा भाग समाविष्ट झाला आहे. धावडे यांच्यावरील गंभीर गुन्ह्य़ांची नोंद बघता त्यांना उमेदवारी देऊ नये अशी पक्षातील काहींची मागणी आहे. दुसरे म्हणजे त्यांना उमेदवारी दिल्यास संघ मुख्यालयाच्या वॉर्डातून भाजपने गुन््हेगारी पाश्र्वभूमी असणाऱ्यांना तिकीट दिल्याचा ठपका पक्षावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेचाही वाद अद्याप कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संजय बंगाले यांना पक्षाने गतवेळी उमेदवारी नाकारली होती. यावेळी त्यांना मिळावी म्हणून फडणवीस आग्रही आहेत. मात्र येथून दोन जणांनी दावे केले आहेत, त्यामुळे येथेही वाद आहे. रेशीमबागेतील विद्यमान नगरसेवक छोटू भोयर यांच्या जागेवर देवेंद्र दस्तुरे आणि रमण सेनाड यांनी दावा केला आहे. उत्तर नागपूरमधील प्रभाग क्रमांक एक, पाच आणि सातमध्ये एकमत होत नसल्याचे या भागाचे आमदार मिलिंद माने यांनी सांगितले. सुरुवातीला ही निवडणूक भाजपसाठी सोपी राहील असे चित्र होते. मात्र इच्छुकांची वाढती संख्या व त्यातून वाढत चाललेली नाराजी बघता यावेळी पक्षाला मोठय़ा बंडखोरीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 1:32 am

Web Title: devendra fadnavis nitin gadkari bjp
Next Stories
1 राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला भाजपची उमेदवारी
2 देवडिया काँग्रेस भवनाला कुलूप
3 क्रिकेट संघटना आणि पोलिसांमध्ये ‘सामना’
Just Now!
X