चांगीच्या धर्तीवर नागपूर, पुणे विमानतळाचा विकास

नागपूर मेट्रो प्रकल्पाकडे फक्त दळणवळणाचे साधन म्हणून पाहणे योग्य नाही तर या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामाच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत, खऱ्या अर्थाने हा प्रकल्प नागपूरच्या विकासवाढीचे इंजिन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

नागपूरच्या मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यातील पाच किलोमीटर जमिनीवरून धावणाऱ्या मार्गावर विजयादशमीच्या दिवशी मेट्रोची ट्रायल सुरू झाली. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेट्रोला हिरवी झेंडी दाखवली, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, स्टेट बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. मेट्रोचे ‘ट्रायल रन’ सुरू होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून आनंद व्यक्त केला.

देशातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी केंद्र शासनाने मान्यता दिली असून या प्रकल्पामुळे नागपुरात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण होईल. नागपूर विमानतळावर कार्गो हब सुविधा उपलब्ध होण्यासोबतच पुणे विमानतळाच्या विकासासाठी जगातील सवरेत्कृष्ट चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणाऱ्या कंपनीसोबत सांमजस्य करार करण्यात आला आहे. याच कंपनीकडून पुण्याच्या विमानतळाचाही विकास करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रारंभी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी प्रकल्पाची माहिती दिली. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गडकरींची कंत्राटदारांना पुन्हा तंबी

मी (गडकरी) किंवा मुख्यमंत्री आम्ही कधीही ‘लक्ष्मीदर्शन’ करीत नाही. त्यामुळे कामाच्या बाबतीत आम्ही कुठलीही तडजोड करीत नाही, कंत्रादारांनी काही काळबेरं केले तर आम्ही झोडून काढू, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विविध विकास कामे करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांना दिली.

महामेट्रोच्या कामाचे कौतुक

केवळ २७ महिन्यात साडेपाच किमीचे काम पूर्ण केल्याबद्दल महामेट्रोचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. याचे श्रेय त्यांनी व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना दिले. कामात चालढकल केलेली गडकरी यांना चालत नाही व त्यांच्या लक्षात आल्यावर ते कोणालाही सोडत नाही, त्यांनी दीक्षित यांच्या कामाचे कौतुक केल्याने त्यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र मिळाल्यासारखे आहे, या शब्दात फडणवीस यांनी दीक्षितांचा गौरव केला व देशातील सर्वात वेगाने काम होत असलेला हा प्रकल्प असल्याचे प्रशस्तीपत्रकही दिले.

समृद्धीसाठी कोरियाचे अर्थसहाय्य

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी निधी देण्याची तयारी कोरियाने दर्शविली असून यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी स्टेट बँकेने सुद्धा ११ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे, त्यामुळे या प्रकल्पासाठी निधी कोठून आणणार हा प्रश्न निकाली निघाला, असे फडणवीस म्हणाले.

वाहतूक मार्गदर्शनासाठी अ‍ॅप

वाहतुकीच्या मार्गदर्शनासाठी मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. प्रथम ते मुबंईत व नंतर राज्यात सर्वत त्याची अंमलबजावणी केली जाईल. तीनशे मीटर परिसरात जीपीएसद्वारे प्रवाशांना त्यांच्या पुढील गतव्यस्थानाबाबत आवश्यक ती सर्व वाहतूक साधनांची माहिती दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

स्कूटरचालक आणि मेट्रोचालक महिला

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी नागपूर हे सुरुवातीपासूनच कसे प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करीत आहे, हे सांगताना ५० वर्षांपूर्वी या शहरात महिला स्कूटर चालवित असल्याचे बघितले होते. हाच धागा पकडून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पन्नास वर्षांनंतर नागपुरात धावणाऱ्या मेट्रोचीही चालक गोंदियाची महिला आहे याकडे लक्ष वेधले.

महामेट्रोचे सर्वत्रचालणारे कार्ड

महामेट्रोने प्रवाशांच्या सोयींसाठी एसबीआयच्या सहकार्याने प्रीपेड मेट्रोकार्ड (सर्वत्र) जारी केले. हे कार्ड राज्यातील सर्व मेट्रो, बस, टोल नाके, महानगर पालिकांची देयके भरण्यासाठी लागू केले जाईल. नागपुरात मेट्रोसह स्थानकावरील मॉल्स, फिडर सेवा, महापालिकेच्या बसेस, खासगी टॅक्सी आणि स्थानकावरील मॉल्समध्येही वापरता येईल, मुख्यमंत्र्यांनी त्याची व्याप्ती वाढवत मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतुकीच्या साधनात त्याचा वापर सुरू करण्याबाबत संकेत दिले.

मल्टीमॉडेल हबसाठी ८०० कोटी

नागपुरात अजनी येथे पॅसेंजर तर खापरी येथे ट्रान्सपोर्ट हब उभारणीसाठी ८०० कोटी रुपये देण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. अजनीतील पॅसेंजर हबसाठी मध्यवर्ती कारागृह, सिंचन कॉलनी तसेच एफसीआय गोदामाची एकूम ७०० ते ८०० एकर जागेवर हे केंद्र असेल, असे गडकरी म्हणाले.