महापुरुष, राष्ट्रसंत, विचारवंताच्या लेखनाचा प्रचार, प्रसार व्हावा, त्यांनी सांगितलेला विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित व्हावा, त्यातून आदर्श समाजव्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा बाळगण्यात काहीही गैर नाही. या अपेक्षेतून कुणी एखाद्या ज्ञानीच्या विचारांचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी मागणी करत असेल तर तेही योग्यच. मात्र, अशा मागण्यांची पूर्तता झाल्यावर त्याचे पुढे काय होते? खरोखरच या विचारांचा प्रसार होतो का? नवी पिढी याकडे कसे बघते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही. अगदी मागणी करणारे सुद्धा ती पूर्ण झाल्यावर समाधानाचा सुस्कारा देत इतरत्र गर्क होतात, तर मागणी मान्य झाल्यावर अंमलबजावणी नीट होते की नाही, याकडे लक्ष ठेवून असणाऱ्यांच्या पदरी अनेकदा निराशा येते. नागपूर व अमरावती विद्यापीठातील विविध अध्यासनांची परिस्थिती बघितली की हेच विचार समोर येतात. नागपूर विद्यापीठाला संत तुकडोजी महाराजांचे व अमरावतीला गाडगेबाबांचे नाव देण्यात आल्यानंतर येथे या संताच्या नावाने अध्यासन सुरू करण्याची मागणी समोर आली. ‘यथोचित’ असे म्हणत ती पूर्ण सुद्धा करण्यात आली. आज या अध्यासनांची स्थिती अतिशय वाईट आहे. केवळ याच नाही तर इतर अध्यासनांची स्थिती सुद्धा तशीच आहे. नागपुरात महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन विचारधारा आणि आंबेडकरांसह रवींद्रनाथ टागोर, अण्णाभाऊ साठे अशी अध्यासने आहेत. शिवाय चक्रधर स्वामींच्या विचाराचे अध्यासन लवकरच येऊ घातले आहे आणि आदिवासी राजे वक्तबुलंदशहा यांचेही अध्यासन हवे अशी आग्रही मागणी आहे. अमरावतीत गाडगेबाबांच्या नावे अध्यासन आहे. यापैकी आंबेडकर विचारधारा व अध्यासन सोडले तर एकालाही राज्यशासन तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नाही. त्यामुळे मान्यता नसलेल्या या अध्यासनात शिक्षण घेतले तरी त्यावर पात्रतेची मोहोर उमटू शकत नाही. मान्यता नसल्यामुळे या अध्यासनाचा खर्च विद्यापीठाला करावा लागतो. परिणामी, विद्यार्थ्यांकडून जास्त शुल्क आकारावे लागते. हा जास्तीचा पैसा खर्च करण्याची तयारी बहुसंख्य विद्यार्थी दाखवत नाहीत म्हणून ही अध्यासने दरवर्षी ओस पडलेली दिसतात. विदर्भातील या दोन्ही विद्यापीठात आंबेडकर विचारधारा सोडले तर एकाही अध्यासनाकडे स्वत:चा अभ्यासक्रम नाही. त्यामुळे नेमके शिक्षण काय घ्यावे, असा प्रश्न इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना पडतो. महात्मा गांधी विचारधारेत केवळ प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. त्यामुळे तिथेही विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी असते. इतर अध्यासनात अभ्यासक्रम का तयार करण्यात आला नाही, असा प्रश्न मागणी करणारे कधी विचारत नाहीत. त्यामुळे विद्यापीठाचे वर्तुळ त्याकडे कधी गांभीर्याने बघत नाही. तुकडोजी महाराजांच्या अध्यासनाचा मुद्दा अनेक संतप्रेमींनी लावून धरला. त्यातून ते सुरू झाले पण अभ्यासक्रमातून परीक्षेसाठी आठ पेपर तयार होतील एवढे विचारधनच विद्यापीठाला गोळा करता आले नाही. अखेर या अभ्यासक्रमात इतर संत साहित्याचा समावेश करावा लागला. या अध्यासनाच्या बाबतीत आग्रही असलेले संतप्रेमी अशा अडचणी कधी ध्यानात घेत नाहीत. विद्यार्थी मिळतात, शुल्क कमी करा अशी मागणी करणारे हे लोक त्यांच्या मुलांना या अध्यासनात पाठवायला तयार होत नाहीत. अशा स्थितीत मग रखडत का होईना एखादे अध्यासन सुरू राहिलेच तर त्यात साठ साठ वर्षांचे विद्यार्थी प्रवेश घेताना दिसतात. जे विद्यार्थीदशेत आहेत त्यांना या अध्यासनात जाऊन महापुरुषांचे विचार शिकणे वेळ वाया घालवण्यासारखे वाटते. हे शिक्षण होऊन कुठे नोकरी मिळते का, हा त्यांचा प्रश्न लाखमोलाचा असतो व त्याचे उत्तर देण्याच्या भानगडीत मागणी करणारे कधी पडत नाहीत. आंबेडकर व गांधींच्या अध्यासनाच्या बाबतीत अशी स्थिती नाही. येथे विद्यार्थी उत्सुक असतात. या महापुरुषांच्या आकर्षणासोबतच मान्यताप्राप्त अभ्यासक्रम असणे, हे विद्यार्थ्यांना बरोबर कळते. मग इतर अध्यासनात काय होते या प्रश्नाच्या उत्तरात डोकावले की कार्यक्रम व भाषणबाजी या दोनच गोष्टी समोर येतात. हे केवळ विदर्भातच घडते असे नाही. राज्यभरातील विद्यापीठांमध्ये ७० पेक्षा जास्त अध्यासने सध्या कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणची स्थिती सारखी आहे. वर्षभरात संबंधित महापुरुषांच्या विचारांशी संबंधित दोन-चार कार्यक्रम घेतले, त्याला प्रसिद्धी मिळवली की या अध्यासनांच्या कक्षाला जे कुलूप लागते ते दुसऱ्या कार्यक्रमाच्या वेळीच उघडते. मग अध्यासनाविषयी आग्रही असणारी मंडळी विद्यापीठाच्या उदासीनतेविरुद्ध ओरडतात. मात्र यातून मार्ग काय काढावा, हे कुणी सुचवत नाही किंवा त्यासाठी प्रयत्न करत नाही. मूळात अशी अध्यासने त्या त्या महापुरुषांच्या विचारांचा अद्ययावत अभ्यास करणारी केंद्रे व्हायला हवीत, तिथे कुणी संशोधन करतो म्हटले तर त्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती व्हायला हवी, पण त्यासाठी ना विद्यापीठ पुढाकार घेत, ना मागणी करणारे! एक-दोन ठिकाणचा अपवाद वगळला तर असे संशोधनासाठी अनुकूल वातावरण कुठेही दिसत नाही. एखाद्या अध्यासनाचा अभ्यासक्रम तयार करणे, त्याला अनुदान आयोगाकडून मान्यता मिळावी म्हणून पाठपुरावा करणे हे खरे तर विद्यापीठाचे काम, मात्र तेही केले जात नाही. कुणी मागणी केली की अध्यासन उघडायचे, कुणी पैसे दिले की इमारत बांधायची व नंतर सारे अडगळीत टाकून द्यायचे हा खरे तर या महापुरुषांच्या विचाराचाच अपमान आहे. तरीही तो कुणाला जिव्हारी लागत नाही इतके निर्ढावलेपण शैक्षणिक वर्तुळात आले आहे. अध्यासनाचा फलक आहे ना, मग झाले, अशा अल्पसंतुष्टित सारे जगताना दिसतात. आजची विद्यार्थ्यांची पिढी नवे काय, या प्रश्नाचा शोध घेत असते. त्यांना जुने नको असते असा युक्तिवाद मग केला जातो, वरकरणी तो अनेकांना खराही वाटतो पण वस्तुस्थिती तशी नाही. ज्यांच्या नावाची अध्यासने आहेत त्यांनी मांडलेले विचार, केलेली साहित्य निर्मिती प्रत्येक काळाला सुसंगत ठरेल अशी आहे. या महापुरुषांच्या विचाराचे आकलन पिढीगणिक नव्याने होऊ शकते एवढी क्षमता त्यात आहे. त्यासाठी लागणारी बौद्धिक मेहनत करायची कुणाची तयारी नाही. त्यामुळे या अध्यासनांना बकाल अवस्था आली आहे. या महापुरुषांच्या विचाराचे नवे अर्थ, अन्वयार्थ आजही संशोधकांकडून मांडले जात आहेत. त्यातून बोध घ्यावा असे या विद्यापीठांना वाटत नाही. संशोधन वृत्तीची वानवा हेच शैक्षणिक वर्तुळासमोरचे सध्याचे मोठे संकट आहे. त्यात ही अध्यासने सापडली आहेत. हा वैचारिक आळशीपणा विदर्भाला शोभून दिसणारा नाही, पण लक्षात कोण घेणार?

devendra.gawande@expressindia.com