देवेंद्र गावंडे devendra.gawande@expressindia.com

हुजूर माफी असावी. आमचे चुकलेच. त्या मूर्तिजापूरच्या प्रशासनाने समाजातील समस्त वर्गाला वंदनीय असलेल्या तुम्हाला दारूच्या दुकानावर नेमण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही फिदीफिदी हसलो. ही आमची पहिली चूक. प्राध्यापकांना गर्दी नियंत्रण करणे चांगले जमते या गैरसमजातून घडलेली. वर्गातील विद्यार्थी सांभाळणे व दुकानासमोरचे नशाप्रेमी सांभाळणे यात फरक असतो हे आमच्या लक्षातच आले नाही. तुम्ही जरी शासकीय सेवक असलात तरी तुमचा दर्जा इतरांपेक्षा वेगळा आहे. तुमचा पगार जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा जास्त आहे. तुम्हाला नेमणाऱ्या अधिकाऱ्यापेक्षा तर कितीतरी जास्त आहे. आणि हो, तुमचे कामही सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा वेगळे. अधिकारी काय केवळ बंदोबस्त लावतात. अधिक चांगल्या शब्दात सांगायचे तर मनुष्यबळ पुरवतात. अर्थात अशा महामारीच्या काळात त्यांना जादा अधिकार असतात हे खरे पण म्हणून त्यांनी थेट तुम्हालाच वाईट समजल्या जाणाऱ्या ठिकाणी कामावर जुंपवावे हे अतिच झाले. या सर्वाच्या तुलनेत तुमचे काम खूप मोठे व वेगळे आहे. विद्यादानाचे. त्यातून विद्यार्थी घडवण्याचे. या घडवलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने सभ्य व सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचे. या कामाची महती शासकीय बाबूंना काय कळणार? शेवटी कायद्यावर बोट ठेवत कागदी घोडे नाचवणारेच ते!

शासकीय सेवकांमध्ये सुद्धा फरक असतो. काही विशेष असतात तर काही सामान्य हे त्यांना कळलेच नाही व या नेमणुकीची चर्चा राज्यभर होऊन गेली. आता या  नेमणुका मागे घेत तुम्हाला वेगवेगळ्या तपासणी नाक्यावर नेमले म्हणे! खरे तर हेही चूकच. लाखोंचा पगार घेणाऱ्या प्राध्यापकाने उन्हातान्हात रस्त्यावर उभे राहायचे. प्रवाशांची कागदपत्रे बघायची. हे वाईटच ना! तरीही ही सेवा तुमची बिरादरी निमूटपणे बजावते आहे असे कळले. आता आम्ही असे अजिबातच म्हणत नाही की तुमचे सर्वच सहकारी निव्र्यसनी आहेत. काही असतील व्यसनी तर त्यासाठी सर्वाना एकाच मापात तोलणे व समस्त वर्गाविषयी चुकीचा ग्रह करून घेणे वाईटच. काहीजण म्हणतात की आता पूर्वीसारखे प्राध्यापक राहिले नाहीत.

एकेकाळी या ज्ञातीचा आदरयुक्त धाक असायचा. नव्याने रुजू झालेला सरकारी अधिकारी सुद्धा आदराने तुमची व्याख्याने ऐकायचा.

ज्ञानामृताचा गोड घोट प्राशन करायचा. नंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. शिक्षणाचे व्यापारीकरण झाले. शिकवण्याच्या, शिक्षण घेण्याच्या साऱ्या व्याख्याच बदलून गेल्या. त्यात नकळतपणे तुम्हीही बदलून गेले. त्यामुळे तुमच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला. कधीकाळी आदराचा भाग असलेले तुम्ही टवाळीचा विषय ठरू लागलो. हे विश्लेषण आमचे नाही, समाजाचे आहे हे कृपया इथे लक्षात घ्या. त्यामुळेच या नियुक्तीवरून सर्वत्र हास्ययोग घडला. आमचे मत विचाराल तर तुम्ही अजूनही आदरणीय आहात. आजच्या व्यवस्थेत एक पिढी घडवण्याची ताकद तुमच्यात आहे. आता ती चांगली घडते आहे की वाईट हा भाग अलाहिदा! पण नेमून दिलेले कार्य नेमस्तपणे करण्याचे काम तुम्ही करत आहात तरीही लोक हसतात तेव्हा वाईट वाटते.

आता काहीजण असेही म्हणतात की कामाच्या तुलनेत तुमचा पगार कितीतरी जास्त आहे. एवढय़ा पगाराची काहीएक गरज नाही. आक्षेप घेणाऱ्यांना हे ठाऊक नाही की पाच तासांच्या नोकरीत तुम्हाला बुद्धीचा किती किस पाडावा लागतो. त्यासाठी रात्रंदिवस वाचन करावे लागते. नवनवे शोधनिबंध लिहावे लागतात. आता घरी गेल्यावर तुम्ही खरोखरच अभ्यास करता की नाही हे कळायला मार्ग नाही. कारण कुणाच्याही घरात डोकावणे शिष्टसंमत नाही. तरीही कुचाळक्या करणारे लोक तुमच्यावर लक्ष ठेवून असतातच. तुम्ही वेगवेगळे निबंध लिहिताना सुद्धा चौर्यकर्म करता, मजकूरच्या मजकूर ढापता. शेवटी संदर्भ देऊन मोकळे होता. कॉपीपेस्ट करता, प्रगतीसाठी आवश्यक असलेले गुण मिळवण्यासाठी बनावट जर्नल्सचा आधार घेता. अगदी पीएचडी पण दुसऱ्यांकडून करवून घेता. मुलाखत देताना मग तुमची तारांबळ उडते. जे तुमच्या नावावर खपवता त्यातले तुम्हाला काहीच ठाऊक नसते. कुणी प्रश्न विचारला तर तुम्हाला धड सांगता येत नाही. तुमच्यातील अनेकांना स्वत: लिहिलेल्या गोष्टींचे स्पष्टीकरण देता येत नाही, असे काहीबाही लोक बोलत असतात. त्यावरही आमचा विश्वास नाही. अनेकांना चांगले लिहिता येते पण बोलता येत नाही. याचा अर्थ तो विद्वान नाही असा होत नाही. त्यामुळे तुम्ही जे करता ते योग्यच असते व प्रामाणिकपणाची झालर त्याला असते असे आवर्जून सांगावेसे वाटते. तरीही लोक बोलतच असतात. लोकशाही असल्याने कुणाचे तोंड बंद करता येत नाही.

आता ताजे उदाहरण बघा ना! गेले दोन महिने अख्खा देश ढवळून निघालाय. अर्थकारण, राजकारण, समाजकारण पार बदलून गेलेले. समाजाची घडी पूर्णपणे विस्कटलेली. फाळणीनंतरचे सर्वात मोठे स्थलांतर होत असलेले. खरे तर हे बदलचक्र अभ्यासकांसाठी पर्वणीच ठरायला हवे. जे घडते आहे त्यामागील कारणे, त्याची मीमांसा, त्यावरची मते, अशा स्वरूपाच्या लेखांचा पाऊस तुमच्याकडून पडायला हवा होता. असे आम्ही नाही, लोक बोलतात. आता हे खरे की प्राध्यापक एक अभ्यासक असतो. अर्थ, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाच्या तज्ज्ञांनी यावर व्यक्त व्हायला हवे होते; पण यामागची दुसरी बाजू बोलघेवडय़ांना ठाऊक नाही. समजा तुम्ही सध्याच्या स्थितीवर एखादा लेख लिहिला तरी माध्यमांनी त्याला उचित प्रसिद्धी द्यायला हवी ना! अनेक ठिकाणी असे घडत नाही. माध्यमे व लेखक यांच्यातील ठराविक साचे तयार झाले आहेत. त्यापलीकडे कुणी जात नाही. मग महत्प्रयासाने एखादा लेख लिहायचा व तो कुणी प्रकाशितच करायचा नाही. यातून हिरमोडच पदरी येणार! त्यापेक्षा न लिहिलेला बरा अशी समजूत तुम्ही करून घेतली असेल तर त्यात काहीही वावगे नाही. लाखोचा पगार असलेले तुम्ही माध्यमांकडे किती खेटा घालणार? हा एकप्रकारचा अपमानच नाही का? त्यापेक्षा आपण भले, आपले घर भले व आपला अभ्यास (?) भला अशी एकांतवासी भूमिका कुणी घेतली असेल तर ती तुमच्या पेशासाठी साजेशीच ठरते. भलेही त्यासाठी वर्तमानपत्रे वाचलीच पाहिजे असे बंधन नाही. शेवटी प्रत्येकाची अभ्यासाची शैली वेगळी असते.

या साऱ्या गोष्टी लक्षात घेता तुम्हाला दारूच्या दुकानावर नेमण्याच्या निर्णयाचा फक्त आणि फक्त निषेधच व्हावा असे आम्हास वाटते. शेवटी विद्वानांच्या जगात जळकुकडय़ांना थारा नसतोच, हे प्राध्यापकांनी लक्षात घ्यावे