प्लास्टिकच्या आवरणाचे निर्जंतुकीकरण होणार; नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांकडून उपकरणाची निर्मिती

नागपूर : करोनामुळे मृत्यू झाल्यास संक्रमण होण्याच्या धोक्याने आप्तेष्टांची शेवटची एकदा चेहरा बघण्याची इच्छा आजपर्यंत पूर्ण होऊ शकत नव्हती. किंबहुना रक्ताच्या नातेवाईकांना बाधित मृतकाच्या अंत्यदर्शन घेणे किंवा अंत्यसंस्काराला जाणेही अशक्यच. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी अतिनील किरणांवर आधारित उपकरण तयार केले असून अशा बाधित मृताच्या प्लास्टिक आवरणाचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करता येणार असल्याने त्यापासून होणारा संक्रमणाचा धोका टाळता येणार आहे.

करोनाबाधित मृतांचे अंत्यसंस्कार फक्त सरकारी कर्मचारी किंवा समाजसेवकच अथवा तीन-चार व्यक्ती समोर येऊन करतात. अचानक करोनामुळे त्यांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराला कोणीच उपस्थित राहत नाही. हा क्लेशदायी प्रकार फार वाढत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही भीती बळावत चालली आहे. बाधिताचा मृत्यू झाल्यास कुणी भटकतही नाही. बाधित मृतामुळे करोना संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने नातेवाईकांना शेवटचे दर्शन घेणेही शक्य होत नाही. लोकांची ही अडचण लक्षात घेता भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. संजय जानराव ढोबळे, दादासाहेब बालपांडे कॉलेजचे (फार्मसी) प्राध्यापक डॉ. नीलेश महाजन व सेवादल महिला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. निरुपमा संजय ढोबळे यांनी एकत्र येऊन अतिनील किरणावर आधारित एक उपकरण तयार केले.

उपकरणाद्वारे मृत करोनाबाधित व्यक्तीला ज्या प्लास्टिकच्या आवरणात ठेवले जाते, त्याचे निर्जंतुकीकरण करून पूर्णपणे करोना विषाणूमुक्त  होऊन त्या मृत व्यक्तीच्या प्रेताजवळ नातेवाईक, मित्र एक मीटर अंतरावरून त्यांना नमस्कार करू शकतात. फुले अर्पण करू शकतात. एवढेच नव्हे जे अंत्यसंस्कारासाठी पुढे येतात, त्याचाही करोनापासून बचाव होतो. यामुळे समाजात होत असलेली मृताची अवहेलना कमी होऊ शकते. सदर उपकरण त्यांनी डिझाईन करून त्याचे पेटंटही प्रकाशित केले आहे. या उपकरणाची निर्मिती अमरावती येथील निशाद इंडस्ट्री येथे झाली आहे. हे उपकरण नागपूर येथील मेडिकलला दिले आहे जेणेकरून याचा योग्य वापर होईल.

असे आहे संशोधन

अल्ट्राव्हायोलेट तंत्रज्ञानाचा वापर करून करोनाद्वारे मृत पावलेल्या व्यक्तीवरील प्लास्टिक आवरणावरील करोना विषाणूचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी अतिनील किरणे  त्यावर पडून कमित कमी पाच मिनिटात विषाणू पूर्णपणे नष्ट करतात. मृत व्यक्तीच्या प्लास्टिक आवरणावर ही किरणे पडल्यामुळे कोणत्याच प्रकारची हानी होत नाही, असे संशोधक

डॉ. संजय ढोबळे यांनी सांगितले.