डॉ. विकास महात्मे यांचे प्रतिपादन

धनगर समाजाचे वास्तव्य महाराष्ट्रातील विविध भागात असताना गेल्या अनेक वर्षांत समाजाला नेतृत्व मिळाले नव्हते आणि जे मिळाले ते दिशाहीन असल्यामुळे हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. आपण धनगर आहोत हे सांगायला अनेकांना लाज वाटते. अशी या समाजाची स्थिती असताना समाजाला खऱ्या अर्थाने नेतृत्वाची गरज असताना त्याचे नेतृत्व स्वीकारले आहे. समाजाच्या मूलभूत प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपने खासदारकी देऊ केली असली तरी समाजाच्या प्रश्नांबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचा पुनरुच्चार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केला.

भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्यानंतर डॉ. विकास महात्मे यांना केंद्रामध्ये समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. धनगर समाजाला आजपर्यंत ना लोकसभेत ना राज्यसभेत प्रतिनिधीत्व मिळाले होते. त्यामुळे त्यांचे प्रश्न घेऊन लढणारे नेतृत्व नव्हते. डॉ. महात्मे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, वैद्यकीय सेवा करताना धनगर समाजाचे नेतृत्व करू असे त्यावेळी वाटले नाही. मात्र, समाजाची अवस्था बघता आणि समाजाची मागणी असल्यामुळे नेतृत्व स्वीकारले आहे. राज्यसभा सदस्यत्व माझ्यासाठी केवळ साधन आहे आणि या साधनाचा उपयोग समाजाच्या आणि वैद्यकीय सेवेसाठी करणार आहे. राज्यात १ कोटी २० लाख धनगर समाज असून तो संघटित झाला आहे. समाजासाठी केवळ घोषणा न करता सरकार दरबारी त्यांच्यासाठी काम करणार आहे.

वैद्यकीय सेवेत काम करताना सामाजिक क्षेत्रात काम करता येते. प्रत्येक ठिकाणी व्यावसायिकता ठेवून काम करण्याची मानसिकता ठेवली तर ते करणे शक्य नाही. तसा प्रयोग गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. धर्मदाय न्यास स्थापन करून वेगवेगळ्या क्षेत्रात लोकांना हाताशी घेऊन त्या कामाची सुरुवात केली आहे. पॅरामेडिकल अभ्यासक्रम आपल्याकडे सुरू करण्याची गरज आहे. संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. समाजात विविध क्षेत्रात नैराश्याची भावना आहे. देशात नैराश्यात जीवन जगणारे २७ टक्के लोक आहेत. त्यातून आत्महत्याचे प्रकार वाढले आहे.

या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने अधोरेखित केलेल्या १० जीवनकौशल्यावर काम करण्याची गरज असून, तसा कार्यक्रम येत्या काळात राबविणार आहे.

समाजात दुर्लक्षित असलेल्या विविध समाजातील दृष्टीहीन असलेल्या लोकांना दृष्टी देण्याचा प्रयत्न करीत असलो तरी त्यांच्यापासून मला सामाजिक कामाची दृष्टी मिळत आहे, असेही डॉ. महात्मे म्हणाले.

समाजात दृष्टी नसलेल्या लोकांची संख्या मोठय़ा प्रमाणात असताना पैशाअभावी कुणीही नेत्रहीन व्यक्ती उपचारापापासून वंचित राहू नये या भावनेतून ‘एसएमएमआय वेलफेयर चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख ७० हजार नेत्राहिनांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यात ७० हजारांहून अधिक मोफत करण्यात आल्या आहेत. ७ लाखांहून अधिक रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत ६५ टक्के रुग्णांवर संस्थेच्या माध्यमातून मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. संस्था आज नागपूसह मुंबई, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, यवतळमाळ, मेळघाट येथील खेडोपाडी आदिवासी व दुर्गम क्षेत्रात कार्य करीत आहे