|| महेश बोकडे

डायबेटिज केयर अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या अभ्यासातील निष्कर्ष

स्मार्ट फोन व इंटरनेटने जगाला जवळ आणले असून एका क्षणात कुणालाही कुठलीही माहिती मिळवता येणे शक्य झाले आहे, परंतु त्याचे काही दुष्परिणामही आहेत. डायबेटिज केयर अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या अभ्यासानुसार, त्यांच्याकडे लठ्ठपणा कमी करण्याचा सल्ला घेण्यासाठी येणाऱ्यांपैकी ५० टक्के लोकांनी इंटरनेटवरील माहितीनुसार परस्पर आहारात बदल केल्याचे निदर्शनात आले आहे. या बदलांमुळे संबंधिताच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहार तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

डायबेटिज केयर अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार, त्यांच्याकडे रोज सुमारे ४० तर वर्षांतील सुट्टीचे दिवस वगळता १३ हजार ५०० जण लठ्ठपणासह इतर त्रास कमी करण्यासाठी आहारात बदलविषयीचा सल्ला घेण्याकरिता येतात. एकूण रुग्णांतील ६० टक्के हे नागपुरातील असतात. एकूण रुग्णांतील ८५ ते ९० टक्के व्यक्ती हे लठ्ठपणा कमी करण्याच्या उद्देशाने येतात.

सेंटरकडून संबंधित व्यक्तीचा इतिहास जाणून घेत असताना ५० टक्केच्या जवळपास व्यक्तींनी इंटरनेटच्या मदतीने पूर्वी एकदातरी आहारात बदल करून वजन कमी केल्याचे निदर्शनात आले आहे. काहींना यातून लाभ झाला. त्यांनी ही माहिती इतरांना दिल्यावर त्यांनीही इंटरनेटवरून किंवा संबंधितांच्या  माहितीनुसार आहारात बदल केले. या आहार पद्धतीमुळे यातील काहींना अशक्तपणा येण्यासह त्यांच्या शरीरातील काही अवयवांवर वाईट परिणाम झाल्याचे आढळले. यात केटोजेनिक पद्धतीने आहार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यात संबंधित व्यक्तीला चरबीयुक्त जेवण घेता येते.

त्यात मांसाहार, तळलेले पदार्थ, हिरवा भाजीपाला, पास्ता, ब्रेड आणि जास्त प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थाचा समावेश आहे. या आहारात संबंधिताला ६५ ते ७० टक्के फॅट, २५ टक्के प्रथिने, पाच ते दहा टक्केच्या जवळपास काबरेहायड्रेट मिळते. काबरेहायड्रेटचे प्रमाण कमी असल्याने बऱ्याच व्यक्तीच्या शरीरात किटोन्स वाढल्याचे निदर्शनात येते. ही संख्या जास्तच वाढल्यास संबंधिताच्या मूत्रपिंडासह इतरही काही अवयवांवर परिणाम होतो, असे आहार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सध्या प्रचलित आहारपद्धती

  • केटोजेनिक आहार पद्धती
  • ग्लुटेन फ्री आहार पद्धती
  • अ‍ॅटकीन आहार पद्धती
  • पेलिओ आहार पद्धती
  • डॉ. दीक्षित यांची दिवसातून दोनदाच जेवणाची पद्धती
  • प्रत्येक दोन तासात थोडे-थोडे खाण्याची पद्धती

केटोजेनिक आहार अपस्मारग्रस्तांना फायद्याचे

अपस्मार (एपिलेप्सी)च्या रुग्णांना आहार तज्ज्ञ केटोजेनिक आहार घेण्याचा सल्ला देतात. या आहारात रुग्णांमध्ये ग्लुकोज आणि इतर घटक वाढतात. त्यामुळे या रुग्णांच्या झटक्यांमध्ये काही प्रमाणात कमी येत असल्याचे विविध अभ्यासात निदर्शनात आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या गरजेनुरूप डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ केटोजेनिक आहाराचा सल्ला देतात.

प्रत्येक दोन तासात थोडे-थोडे खा

आजारपण, वजन कमी करणे, फिट राहणे यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आहार आवश्यक आहेत. वजन कमी करण्यासाठी दीर्घकालीन आहाराचे नियोजन फायद्याचे ठरू शकते. त्यासाठी दिवसाला आवश्यक अललेले एकंदरीत सर्वच प्रकारचे अन्न प्रत्येक दोन-दोन तासांच्या अंतराने थोडे-थोडे घेतल्यास रुग्णांना लाभ होऊ शकतो, परंतु त्यासाठी आहार तज्ज्ञांसह डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे.    – डॉ. पिनाक दंदे, शल्यचिकित्सक, नागपूर</strong>

आहारातील परस्पर बदल हानीकारक

प्रत्येकाची शरीरयष्टी आणि शरीरातील विविध घटकांचे प्रमाण वेगळे राहत असल्यामुळे त्यानुसार आहारात बदल गरजेचा असतो. या अचानक होणाऱ्या बदलामुळे संबंधिताला अशक्तपणा येण्यासह त्याच्या शरीरातील मूत्रपिंड, हृदयासह इतरही काही अवयवांना धोका संभावतो. त्यामुळे आहार तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहारातील बदल करायला हवे.     – कविता गुप्ता, आहाररोगतज्ज्ञ, डायबेटिज केयर अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर, नागपूर.