आहार प्रदर्शनात महिलांसाठी आहारासंबंधी माहिती

चपाती-भाजी, दही, वरण-भात आणि सलाद ही महाराष्ट्रीय थाळी पूर्ण पोषक आहार असल्याचा दावा आहार प्रदर्शनात करण्यात आला. तळलेले पदार्थ, फास्ट फूड किंवा जंक फूड टाळून पालेभाज्या, फळभाज्या सर्वोत्तम आहार असल्याचे प्रदर्शनात दर्शवण्यात आले होते.

महापालिका आणि नागपूर स्त्री रोग संघटनेच्यावतीने सुरेश भट सभागृहात आयोजित आहार प्रदर्शनात शून्य ते सर्व वयोगटातील महिलांच्या आहारासंबंधीची माहिती देण्यात आली.

बदलत्या जीवनशैलीत पौष्टिक आहार आणि काम करणाऱ्या महिलांच्या वेळेची बचत व्हावी म्हणूनही काही रेसिपी सांगण्यात आल्या. काय खावे, कधी खावे, कसे खावे या सर्वच बाबींची माहिती यावेळी सांगण्यात आली. आधार, इंडियन डायबेटिक असोसिएशन आणि विष्णू की रसोई यांच्या सहकार्याने महापालिकेने दोन दिवसीय पोषण आहार प्रदर्शन भरवले होते.

बाल्यावस्था व पौगंडावस्थेतील मुलींसाठी विशेष आहार, प्रजननशील अवस्थेतील महिलांसाठी पोषक आहाराची आखणी, प्रौढावस्था व वृद्धापकाळातील महिलांसाठी आहारविषयक माहिती गर्भावस्थेतील मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंड विकार अशा वेगवेगळ्या आजारांवरील आहाराची माहिती, लठ्ठपणा यावर प्रतिबंध घालण्यासाठी समतोल आहाराची माहिती विविध स्टॉलवर उपलब्ध करण्यात आली होती. जीवनसत्त्वांचे स्रोत, सूर्यप्रकाशामुळे मोफत मिळणारी जीवनसत्त्वे, त्यांच्या अभावामुळे होणारे परिणाम हे सेमिनरी हिल्स परिसरातील एलएडी महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच सिम्स रुग्णालयातून आलेल्या मुलींनी स्पष्ट केले. महाराष्ट्रीय थाळी हा पूर्ण आहार असून त्यात शरीराला आवश्यक पोषण मिळते, असे यावेळी सांगण्यात आले.

विद्यार्थिनी उपाशी

आहार प्रदर्शनात वेगवेगळ्या महापालिका शाळेतील मुलींना बोलावण्यात आले. मात्र, त्यांच्या आहाराची काळजी घेण्यात आली नाही. काही विद्यार्थिनींनी डबे आणले होते, तर काही विद्यार्थिनींना माहितीच नसल्याने दुपापर्यंत त्या उपाशीच होत्या. प्रश्नमंजूषेसारख्या इतरही स्पर्धामध्ये मुलींनी भाग घेतला. तोपर्यंत दुपार झाली होती. विद्यार्थिनी भुकेल्या होत्या. त्यांना आहाराची गरज होती.

प्रश्नमंजूषेत सरस्वती विद्यालय प्रथम

आहारावर आधारित प्रश्नमंजूषेत बजोरियाच्या सरस्वती तिवारी हिंदी माध्यमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावला, तर दुसरा क्रमांक महालमधील साने गुरुजी शाळेच्या मुलींनी पटकावला. सरस्वती तिवारी विद्यालयाच्या सुंबुल कुरेशी, तृप्ती दुबे, आयेशा अली, भावना बहोरिया या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व १५० रुपये प्रदान करून गौरवण्यात आले. त्यांना संगीता खसाळे आणि सरला बहोरिया या शिक्षकांनी प्रश्नमंजूषेसाठी तयार केले होते.