13 August 2020

News Flash

पदव्युत्तर प्रवेशासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत वेगवेगळे शुल्क

आर्थिक अडचणीने विद्यार्थ्यांसमोर संकट

संग्रहित छायाचित्र

महेश बोकडे

करोनाच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर जागेवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्राथमिक शुल्क किती घ्यावे याचा गोंधळ कायमच आहे. काही महाविद्यालयांनी नाममात्र शुल्कावर विद्यार्थ्यांना प्रवेश देत नंतर शुल्क भरण्याची मुभा दिली तर काही महाविद्यालये जास्त शुल्क आकारत आहेत.

गुणवत्ता यादीनुसार विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पदव्युत्तर जागेवर प्रवेश दिला जात आहे. करोना संकटामुळे  महाविद्यालयांनी त्यांच्याकडे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशाची मुभा द्यावी, काही कागदपत्रे वा शुल्क आता उपलब्ध नसल्यास पुढे ती जमा करावी, अशी सूचना शासनाने वैद्यकीय महाविद्यालयांना दिली होती. परंतु वैद्यकीय शिक्षण खात्याने आर्थिक अडचणीतील विद्यार्थ्यांकडून किती प्राथमिक शुल्क आकारावे हे निश्चित न केल्याने प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत वेगवेगळे शुल्क आकारले जात आहे.

नागपूरच्या मेडिकलसह काही महाविद्यालयांत पूर्ण शैक्षणिक सत्राचे शुल्क न भरणाऱ्यांचे प्रवेशही रोखले जात असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. औरंगाबादच्या घाटी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून १५ हजार प्राथमिक शुल्क घेतले जात आहे. त्यानुसार पाच जणांना प्रवेशही दिल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. नागपूरच्या मेयो महाविद्यालयात शैक्षणिक शुल्काच्या ५० टक्के शुल्क घेतले जात आहे.  मेडिकलमध्ये पूर्णच शैक्षणिक शुल्क भरण्याचा प्रशासनाचा आग्रह आहे. परंतु उपअधिष्ठाता डॉ. ब्रिजेश गुप्ता यांनी ७५ टक्केच शुल्क घेतले जात असल्याचा दावा केला आहे. मुंबईतील सायनच्या एल.टी.एम. मेडिकल कॉलेज, केईएम, नायर या महाविद्यालयांमध्ये २,०२५ रुपये घेऊन प्रवेश दिला जात असल्याचे मार्ड संघटनेचे म्हणणे आहे.यासह इतर महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना शिल्लक इतर शुल्क निश्चित कालावधीत भरण्याची अट टाकून तसे शपथपत्रही घेतले जात आहे. त्याला विद्यार्थ्यांचेही समर्थन आहे. या विषयावर वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क  होऊ शकला नाही.

करोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण खात्याने मध्यप्रदेशसह मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या धर्तीवर नागपूरसह सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्राथमिक स्वरूपात नाममात्र शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची गरज आहे.

– डॉ. मुकुंद देशपांडे, मार्ड (मेडिकल), नागपूर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 12:28 am

Web Title: different fees in government medical colleges for postgraduate admission abn 97
Next Stories
1 अनुष्काच्या घरात सापडला डायनॉसोर, नागपूर पोलीस म्हणतात वन-विभागाला पाठवू का??
2 Coronavirus Outbreak : शहरात आता केवळ ८४ करोनाग्रस्त
3 आता बारमधूनही घरपोच मद्य मिळणार
Just Now!
X