राज्य सरकारच्या डिजिटल ग्राम योजनेतून डिजीटल झालेल्या नागपूर जिल्ह्य़ातील पाच गावात यापुढे तेथील शाळांमध्ये डिजीटल क्लासरूम्स अन् ग्रंथालये सुरू केली जाणार आहे. दरम्यान, या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या जिल्ह्य़ातील ७७६ गावांचा समावेश करण्यात आला असून यासाठी लागणारे ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे ४०० पेक्षा अधिक गावात पोहोचविण्यात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर नागपूर जिल्ह्य़ातील खंडाळा (ता. मौदा), खसाळा (कामठी), तरोडी बुद्रूक (कामठी), दाभा (हिंगणा), विहिरगाव (नागपूर ग्रामीण) पाच गावे डिजीटल करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत त्यांच्या वर्षां या निवासस्थानावरून व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या पाचही गावांतील नागरिकांशी संवाद साधला. खसाळा गावातील काही रुग्णांना या योजनतील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट मुंबईतील जे.जे. इस्पितळातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधता आला. या गावात वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अमेरिकेच्या सिस्को कंपनीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचा वापर डिजिटल ग्रामसाठी केला जात आहे. या डिजीटल क्रांतीमुळे कृषी, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील अत्याधुनिक माहिती गावकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
याचाच एक भाग म्हणून यापुढे डिजीटल क्लासरूम आणि डिजीटल ग्रंथालये या गावात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. डिजीटल ग्राम योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नागपूर जिल्ह्य़ातील ७७६ गावांचा समावेश असून तेथे पुढील तीन महिन्यात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ही गावे ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडली जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४०० ते ४५० गावांपर्यंत हे काम पूर्ण होत आले असून यापुढे ते सर्व ७७६ गावापर्यंत पोहोचल्यावर ही गावेही डिजीटल केली जाणार आहेत.

युद्धपातळीवर काम
प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे, ती सांगूनही हलत नाही, मंत्र्यांचेही आदेश तांत्रिक कारणे देऊन धाब्यावर बसविले जातात, अशी टीका नेहमीच या यंत्रणेवर होत असताना नागपूरमध्ये डिजीटल ग्रामच्या निमित्ताने वेगळा अनुभव आला. यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा राबली. माहिती तंत्रज्ञान विभागाकडे नागपूर विभाग पातळीवर मनुष्यबळाची कमतरता आहे. एका अधिकाऱ्याने तीन दिवसात तीन तालुक्यातील पाच गावांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला. त्यानंतर सिस्कोची टीम नागपुरात दाखल झाली. त्यांनी त्यांची सर्व सामुग्री पाचही गावात उभारून तेथे डिजीटल सेवा दिली. तीन दिवसात ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या सेवेमुळे गावात वेगळेच वातावरण पाहायला मिळाल्याचे आय.टी. विभागाचे विभागीय प्रकल्प व्यवस्थापक विनय पहलाजानी यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.