कोटय़वधींच्या सडलेल्या सुपारी जप्त

आरोग्यास हानिकारक व सडलेल्या सुपारीविरुद्ध ‘लोकसत्ता’च्या वृत्तमालिकेची दखल घेऊन महसूल गुप्तचर संचालनालयाने नागपुरातील अनेक सुपारी गोदाम आणि शीतगृहांवर छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत कोटय़वधींची सडलेली सुपारी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

सुपारीची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ नागपुरात आहे. मात्र, नागपुरात सुपारीच्या नावाखाली गोरखधंदा सुरू असून येथील सातशेच्यावर व्यापारी सडलेली सुपारी इंडोनेशिया आणि नायजेरिया येथून आयात करतात. त्या सुपारीला ‘सल्फर डायऑक्साईड’च्या भट्टीत भाजून ती निकृष्ट दर्जाची सुपारी बाजारात विकतात. त्यामुळे ती सुपारी आरोग्यास हानिकारक ठरते. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रकाशित केली. त्या वृत्तांची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली व अन्न व औषध प्रशासन विभागाला कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे शहरातील अनेक सुपारी व्यापारी, गोदाम व शीतगृहांवर छापेमारी करून जवळपास ४ कोटींची सुपारी जप्त केली.

मात्र, सुपारी व्यापारी सर्व व्यवहार कच्च्या कागदांवर करतात आणि कोटय़वधींचा महसूल बुडवत असल्याची बाबही ‘लोकसत्ता’ने उजेडात आणली होती. त्याची दखल केंद्राच्या वित्त मंत्रालयांतर्गत कार्य करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुपारी व्यापाऱ्यांसंदर्भात माहिती गोळा केली. त्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी सकाळपासून तीन महिला अधिकारी व चार पुरुष अधिकाऱ्यांनी कळमना परिसरातील उमरी फाटा, कोलकाता ढाब्याजवळील गोयल शीतगृहासह इतर गोदामावर छापा टाकला व सुपारी जप्त केली. ही कारवाई रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होती. मात्र, परिसरात काळाकुट्ट अंधार झाल्याने अधिकाऱ्यांनी रात्रीची कारवाई थांबवली. उद्या, शुक्रवारी पुन्हा कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या शीतगृहात कोटय़वधींची सुपारी साठवण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

असोसिएशनच्या अध्यक्षाचीही सुपारी जप्त

शीतगृहात अनेक व्यापाऱ्यांची सुपारी सापडली. अधिकाऱ्यांनी सर्व व्यापाऱ्यांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडील आर्थिक व्यवहारांच्या दस्तावेजांची छाननी केली. यात सुपारी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हारुभाई ऊर्फ हरीष किसनानी यांचीही लाखोंची सुपारी असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात हारुभाई यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

कार्यालयाला डीआरआयने भेट दिली

काही दिवसांपूर्वी सुपारीविषयी वृत्तपत्रातील बातमीच्या आधारावर डीआरआयने अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क केला होता. त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून त्यांनी केलेल्या कारवाईची माहिती गोळा केली. त्यानंतर डीआरआयचे अधिकारी निघून गेले होते. त्यानंतर त्यांनी त्या माहितीचे काय केले व कुठे कारवाई केली, याची कल्पना विभागाला दिली नाही.

अभय देशपांडे, दक्षता अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (अन्न)