22 January 2018

News Flash

रेल्वे स्थानक स्वच्छतेत विदर्भाची पीछेहाट!

मध्य रेल्वेतही नागपूर पिछाडीवर

राजेश्वर ठाकरे, नागपूर | Updated: May 20, 2017 1:41 AM

नागपूर रेल्वे स्थानकावरील अस्वच्छता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छता अभियान हाती घेतल्यानंतर भारतीय रेल्वेनेही ‘स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत’ योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांच्या स्वच्छेतवर भर दिला असून त्रयस्थ संस्थेकडून स्वच्छतेची तपासणी करण्यात आली. यात विदर्भातील रेल्वे स्थानके स्वच्छतेत पिछाडीवर असून नागपूर रेल्वे स्थानकाचे स्थान २३७ क्रमांकावर आहे. मात्र, बडनेरा स्थानकांची चांगली कामगिरी असून या स्थानकाला पहिल्या दहामध्ये स्थान मिळाले आहे.

विदर्भात नागपूर, वर्धा, बल्लारशा, गोंदिया हे प्रमुख जंक्शन आहेत. याशिवाय अकोला, चंद्रपूर, बडनेरा, अमरावती या प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. देशातील रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेबाबत क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय)च्या माध्यमातून सर्वेक्षण झाले. या यादीत डायमंड क्रॉसिंगसाठी प्रसिद्ध नागपूर स्थानकाचा समावेश नाही. मात्र, पश्चिम विदर्भातील बडनेरा आणि अमरावती रेल्वे स्थानकांच्या क्रमवारीत सुधारणा झाली. या दोन्ही स्थानकांचा यादीत समावेश आहे.

देशातील ए-वन व ए-श्रेणीतील ४०७ रेल्वे स्थानकांचे स्वच्छतेबाबत सर्वेक्षण करण्यात आले. रेल्वे परिसरातील वाहनतळामधील स्वच्छता, मुख्य प्रवेशद्वार आणि परिसर, प्रतीक्षालयातील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसेच स्वच्छतेबाबत प्रवाशांचे अभिप्राय घेण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूर स्थानकाची क्रमवारी ३१० वरून २३७ अशी सुधारली असली तरी देशातील पातळीवर घाणेरडे शहर अशीच ओळख निर्माण झाली आहे.

काय होते निकष ?

 • रेल्वे स्थानकाच्या सर्वेक्षणासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली होती. स्थानकांवर प्रत्यक्ष जाऊन व प्रवाशांसोबत संवाद साधण्यात आला. त्यांची स्वच्छतेबाबत मते जाणून घेण्यात आली. स्वच्छतेच्या ४० निकषांवर प्रवाशांना रेटिंग देण्यास सांगण्यात आले होते.
 • या सर्वेक्षणात फलाट, रेल्वे डबे, प्रसाधनगृहातील स्वच्छता यावर विशेष भर देण्यात आला. दोन टप्प्यांत झालेल्या सव्‍‌र्हेत पहिल्यांदा आयआरसीटीसीतर्फे २०१६मध्ये सर्वेक्षण झाले. यात प्रवाशांकडून स्वच्छतेबाबत अभिप्राय घेण्यात आले. दुसरे सर्वेक्षण क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय)तर्फे करण्यात आला. या संस्थेने ४०७ ए व ए वन गटातील स्थानकावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

कुठे कमी पडले?

 • ’रेल्वेगाडय़ांची देखभाल आणि साफसफाई, व्हेंटिलेशन.
 • ’रेल्वेगाडय़ांची नीट सफाई होत नसल्याने डब्यांमध्ये ढेकूण आणि किडे दिसून आले.
 • ’पीट लाइनजवळ स्वच्छतेचा अभाव.
 • ’रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थासाठी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर.
 • ’स्थानकावर कचरापेटय़ांची कमतरता आणि स्वयंपाकघराच्या परिरसरात साफसफाईचा अभाव.
 • गुण देण्याची पद्धत
 • ’वाहनतळ परिसर, मुख्य प्रवेशद्वार परिसर, फलाट आणि प्रतीक्षालयातील स्वच्छतेसाठी ३३.३३ टक्के गुण होते.
 • ’क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय)ची सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ३३.३३ टक्के गुणांची तरतूद होती.
 • ’रेल्वे प्रवाशांचे अभिप्रायाला ३३.३३ टक्के गुण होते.

मध्य रेल्वेतही नागपूर पिछाडीवर

 • मध्य रेल्वेत नागपूर रेल्वे स्थानक २५व्या क्रमांकावर आले आहे. नागपूर विभागीय पातळीवरील स्वच्छतेच्या यादीत बल्लारशहा पाच, चंद्रपूर सहा, वर्धा सात क्रमांकावर आहेत.

देशात विदर्भाचे रेल्वे स्थानक

 • देशातील ए वन आणि ए दर्जाच्या ४०७ रेल्वे स्थानकांमध्ये बडनेरा रेल्वे स्थानक सहावे स्थानावर आहे. अमरावती रेल्वे स्थानक अकराव्या क्रमांकावर आहे. बल्लारशहा २३, चंद्रपूर ३८ आणि वर्धा ३९ व्या क्रमांकावर आहे.

 

 

First Published on May 20, 2017 1:41 am

Web Title: dirty railway stations in vidarbha
 1. No Comments.