नुकतेच इंग्लंड येथे झालेल्या ट्वेंटी -२० च्या जागतिक मालिकेत भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने पहिल्यांदा विजेतेपद पटकावले. मात्र, त्याची साधी दखल केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा भारतीय नियामक मंडळाने घेतली नाही, अशी खंत भारतीय दिव्यांग क्रिकेट संघातील विदर्भाचा एकमेव क्रिकेटपटू गुरुदास राऊत याने व्यक्त केली. तो फिजिकल चॅलेंज क्रिकेट असोसिएशन ऑफ नागपूरच्या वतीने स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरच्या कार्यालयात आयोजित सत्कार समारंभात बोलत होता. यावेळी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गुरुदास म्हणाला, आम्ही इंग्लंडच्या मायभूमीत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश तसेच इंग्लंडसारख्या बलाढय़ संघाला  पराभूत करून पहिल्यांदा जेतेपद पटकावले. ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, याचे कौतुक केवळ ट्विटरवर झाले. मात्र आमची आíथक बाजू मजबूत करण्यासाठी कोणीच आम्हाला मदत केली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला शासनस्तरावर बक्षिसाची अपेक्षा होती. मात्र, पदरी निराशा पडली. २०१५ साली भारतीय दिव्यांग संघाने इस्लामाबाद तेथे झालेल्या ट्वेंटी-२० आणि एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून जेतेपद पटकावले होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमच्या कामगिरीची दखल घेत मुंबईत सन्मान करून प्रत्येक दिव्यांग क्रिकेटपटूंना प्रत्येकी एक लाख रुपये दिले होते. मात्र यंदा जागतिक मालिका जिंकूनही कुणी दखल घेतली नाही, असे त्याने सांगितले.  या कार्यक्रमाला भूषण दडवे, उत्तम मिश्रा, नामदेव बल्गर, संजय भोस्कर आणि धनंजय उपासणे उपास्थित होते.

देशासाठी अभिमानाची बाब

क्रिकेटच्या देशात जाऊन भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने मिळवलेले विजेतेपद देशासाठी अभिमानाची बाब आहे. विदर्भातून एकमेव गुरुदास भारतीय संघाचा सदस्य होता.त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. शासनस्तरावर त्याचे कौतुक झाले पाहिजे.  गुरुदासचा शिवछत्रपती पुरस्कारासाठी देखील विचार होण्यास काहीच हरकत नाही, असे मत नीलेश भरणे यांनी व्यक्त केले.