16 January 2021

News Flash

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अविरत परंपरेला यंदा खंड

सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने देशभरातील अनुयायांमध्ये निराशा

| September 30, 2020 12:37 am

(संग्रहित छायाचित्र)

देवेश गोंडाणे

शतकानुशतके चालत आलेल्या वर्णव्यवस्थेला बाबासाहेबांनी मूठमाती दिली तो दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन. त्या दिवसाचे स्मरण व बाबासाहेबांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमीवर येतात. मात्र, करोनामुळे यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रमच रद्द झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला धर्मातर करून लाखो शोषितांच्या जीवनात बदल घडवून आणला. दीक्षाभूमीवरील या धम्मदीक्षा सोहळ्याने लाखो अनुयायांच्या मनात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले. त्यामुळेच या दिवशी दरवर्षी दीक्षाभूमी निळ्या पाखरांनी सजू लागते. मात्र, करोनासारख्या जागतिक महामारीमुळे तब्बल ६४ वर्षांनी या सोहळ्याला खंड पडणार आहे. कार्यक्रम रद्द झाल्यामुळे या गोष्टींची खंत समाजामध्ये आणि आम्हालाही असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी सांगितले. दीक्षाभूमीवर येणाऱ्यांमध्ये दरवर्षी ३० टक्के नवीन लोकांचा समावेश असतो. यामध्ये बहुतांश तरुणाई असते. ही तरुणाई  बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये पसरवण्यासाठी येथून प्रेरणा घेत असते. मात्र, या सगळ्याच गोष्टींना यंदा मुकावे लागणार आहे.

डॉ. आंबेडकर अध्यासनाचे माजी प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनीही धम्मचक्र प्रवर्तन दिनाला करोनामुळे खंड पडल्याची खंत व्यक्त केली. डॉ. आगलावे यांनी सांगितले की, तब्बल ६४ वर्षांनंतर प्रथमच दीक्षाभूमीवर अनुयायांचा महापूर दिसणार नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिनी लोक दीक्षाभूमीवर येऊन केवळ येथील स्तुपाचे दर्शनच घेत नाही तर प्रत्येक व्यक्ती येथून समता, बंधुता आणि स्वाभिमानाची शिकवण घेऊन जात असतो.  याशिवाय पुस्तक विक्रीसाठी दीक्षाभूमी फार प्रसिद्ध आहे. देशभरातील मोठमोठी  दुकाने येथे येतात. दरवर्षी कोटय़वधींच्या पुस्तकांची विक्री होते. या पुस्तकांच्या रूपात अनुयायी बाबासाहेबांच्या विचारांची शिदोरी घेऊन जातात. मात्र, यंदा या परंपरेला खंड पडणार असल्याचे ते म्हणाले.

व्यवसायालाही फटका

धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. त्यामुळे येथे कोटय़वधींच्या पुस्तकांसह अन्य वस्तूंचीही मोठी विक्री होत असते. एकटय़ा दीक्षाभूमी परिसरामध्ये आठशे दुकाने लागत असल्याचे स्मारक समितीने सांगितले. याशिवाय शहरातील व्यवसायाचीही उलाढाल वाढते. मात्र, यंदा हा सोहळा रद्द झाल्याने कोटय़ावधीच्या व्यवसायाला फटका बसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2020 12:29 am

Web Title: disappointment among followers across the country due to cancellation of all dhamma chakra pravartan day events at deekshabhoomi abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 नागपुरातील एकूण करोना बाधितांपैकी ६१ टक्के केवळ सप्टेंबर महिन्यातील
2 ‘रेमडेसिवीर’ नि:शुल्क न मिळण्याला ‘एम्स’च जबाबदार
3 तपासणी केंद्रांवरील गर्दी घटल्यानेच चाचण्या कमी
Just Now!
X