महाराष्ट्रातील उत्तर पश्चिमी घाटामधून काटेचेंडू वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, साठे्य महाविद्यालय तसेच इटलीतील कॅमेरिनो विद्यापीठातील संशोधकांनी हा शोध लावला आहे. ‘इचिनॉप्स सह्य़ाद्रीकस’ असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. नॉथ्र्डक जर्नल ऑफ बॉटनी या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
उत्तर पश्चिम घाटाच्या स्थानिक जैवविविधतेबाबतच्या ‘उत्तर पश्चिमी घाटातील उंच पठारांच्या स्थानिक जैवविविधतेचे मूल्यांकन’ या प्रकल्पावर काम करताना क्षेत्रीय सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना ही प्रजाती सापडली. या प्रकल्पाचे नेतृत्व बीएनएचएसचे संवर्धन अधिकारी हर्षल भोसले यांनी केले आहे.
या संशोधन चमूत वनस्पतीशास्त्रज्ञ सुशांत मोरे, कॅ मेरिनो विद्यापीठातील संशोधक फॅ बिओ कॉन्टी यांचा समावेश आहे. मुंबईतील बृहृद भारतीय समाजाचे श्रीपाद हळबे यांनी या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य केले. या चमूने आतापर्यंत भारतातील महाराष्ट्र, गुजरात तसेच कर्नाटक राज्यात शोधमोहीम राबवली. ऑगस्ट २०१९ मध्ये उत्तर पश्चिम घाटासाठीच नवे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही प्रजाती नवीन असल्याचे संशोधन चमूला आढळले.
ही नवी प्रजाती वनस्पतींच्या ‘इचिनॉप्स’ कु ळातील आहे. जगभरात या कु ळात १३० प्रजाती सापडतात. त्यापैकी पाच प्रजाती देशात आणि त्यातील दोन महाराष्ट्रात आढळतात.
महाराष्ट्रात ही प्रजाती नव्याने सापडल्यामुळे या जागेवरून ‘इचिनॉप्स सह्य़ाद्रीकस’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. नाशिकमधील साल्हेरच्या उत्तरेपासून ते दक्षिणेस कोल्हापूपर्यंत ही प्रजाती प्रदेशनिष्ठ आहे. जगभरात ती के वळ याच भागात आढळते. सह्य़ाद्री खोऱ्यातील पुरातन किल्ल्यांवरील उतारांवर ती आढळते. ही प्रजाती साधारण २०० सेंटीमीटपर्यंत वाढते आणि त्याचा व्यास गोलाकार चेंडूसारखा नऊ सेंटीमीटरचा असतो. काटेचेंडू प्रजातीतील सर्वात मोठा हा फु लोरा आहे. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान ही वनस्पती उगवते. दरम्यानच्या काळात त्यांची मुळे जमिनीतच असतात. नोव्हेंबरमध्ये त्यांना फु लांचा बहर येतो आणि डिसेंबरमध्ये त्यांना फळ येतात. फु लांना गोड सुवास असल्याने कीटक आणि विशेषकरून मधमाशा आकर्षित होतात.
घाटांमधील रस्ता रुंदीकरण, किल्ल्यांची दुरुस्ती यासारख्या विकास प्रकल्पांचा विघातक परिणाम या प्रजातीवर होऊ शकतो. ही प्रजाती केवळ महाराष्ट्रातच सापडत असल्याने तिच्या संवर्धनाची गरज असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 12:25 am