हेमीफायलोडॅक्टीलस कुळातील सदस्यांत भर

नागपूर : हेमीफायलोडॅक्टीलस (स्लेंडर गेको) या कुळातील पाली फक्त पश्चिम भारत म्हणजेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ  व आंध्र प्रदेशातील पूर्व घाटात आढळून येतात. या कुळात एकूण चार पालीच्या प्रजातींची भारतात नोंद होती. त्यात आणखी दोन प्रजातींच्या पालीची भर पडली आहे. तामिळनाडूतून या दोन पालीच्या प्रजाती शोधण्यास संशोधकांच्या चमूला यश आले आहे.

भारतात शोधण्यात आलेल्या चार पैकी तीन प्रजातींचा शोध गेल्यावर्षी म्हणजेच २०१९ मध्ये याच संशोधकांच्या चमूने लावला होता. आता त्यात दोन प्रजातींची भर पडली असून याबाबतचा शोधनिबंध ‘झुटाक्सा’ या नामांकित जर्नलमधून प्रकाशित झाला आहे. हेमीफायलोडॅक्टीलस या कुळातील आणखी दोन जातींच्या शोधानंतर भारतामधून या कुळातील पालींची संख्या सहा वर गेली आहे. अजून किमान सहा नवीन प्रजातींचा अभ्यास सुरू असून त्या लवकरच जगासमोर येतील, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. हेमीफायलोडॅक्टीलस  निलगिरीएनसीस (निलगिरी स्लेंडर गेको: ) ही पालीची प्रजाती संशोधकांना तामिळनाडूच्या निलगिरी पर्वतरांगेत आढळून आली. ही पाल फक्त ह्यच ठिकाणी सापडते. त्यामुळे या पालीचे नामकरण याच पर्वतरांगेच्या जागेवरून निलगिरीएनसीस असे केले. याशिवाय, निलगिरी पर्वतरांगेत असलेल्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या प्रजातीला असे नाव दिले आहे.

इतर प्राण्याच्या जातीपेक्षा वेगळे स्वरूप

या दोन्हीही पालीच्या जातींचे नमुने आम्हाला सर्वप्रथम २०११ साली मिळाले होते व २०१८ पासून आमच्या संशोधकांचे काम सुरू होते. या दोन्ही पालींचा डीएनए, अंगावरील खवले आणि पायावर, मांडीवर असलेल्या ग्रंथींच्या संख्येचा अभ्यास करून त्या या कुळातील इतर प्राण्याच्या जातीपेक्षा वेगळे आहेत, असे संशोधनाअंती निष्पन्न झाले. त्यामुळे आम्ही या दोन्ही पालींचे दोन वेगळ्या जाती म्हणून नामकरण केले, असे संशोधकांनी सांगितले.

यांनी केले संशोधन

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन, मुंबई आणि नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस येथे अक्षय खांडेकर आणि ईशान अगरवाल हे संशोधक म्हणून कार्यरत आहेत. सौनक पाल हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी येथे संशोधक आहेत. एरन बावर हे विलानोवा युनिव्हर्सिटी, पेनसिल्व्हानिया येथे जीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत. अच्युतन श्रीकांतन हे सेंटर फॉर बायलॉजिकल सायन्सेस बंगलोर येथे कार्यरत आहेत.