नंदनवन येथील महिला महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागांच्या वतीने ‘स्वतंत्र विदर्भ राज्य होणे का आवश्यक’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘छोटे राज्य सुखी राज्य’ ही संकल्पना समोर ठेवून विदर्भाला अधिक समृद्ध करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ आंदोलन समिती कार्यरत असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अरुण केदार यांनी मांडली.

डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्याख्यानात येथील सर्व जनतेच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य होण्याची आवश्यकता स्पष्ट केली. २८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर करार झाला, त्यातील १० कलमांपैकी एकही कलम पूर्ण न केल्याने त्याचा विदर्भाला कोणताच फायदा झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. अ‍ॅड. वामनराव चटप यांनी विदर्भातील राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती कशी समृद्ध आहे याची आकडेवारी काही दाखल्यांसह स्पष्ट केली. स्वतंत्र विदर्भ राज्य होणे हे पुढील पिढीसाठी आवश्यक आहे आणि त्याचे फायदे या पिढीला मिळणार आहेत म्हणून ते झालेच पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.

प्राचार्या डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची घटनेत तरतूद आहे. परंतु त्यासाठी सुरु असलेले आंदोलन हिंसक पद्धतीने चालले आहे. विद्यार्थीनींना यासंबंधीची योग्य पद्धतीने माहिती व्हावी म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला सुमारे दीडशे विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सर्वानी स्वतंत्र विदर्भ आंदोलनात सहभागी होण्याबाबत शपथ घेतली. कार्यक्रमाचे संचलन प्रा. डॉ. राष्ट्रपाल गणवीर यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. चंद्रशेखर गिते यांनी करून दिली. आभार प्रदर्शन प्रा.डॉ. प्राची देशपांडे यांनी केले. कार्यक्रम ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती’तर्फे आयोजित करण्यात आला होता.