निर्माते-वाहिन्यांचे प्रमुख यांच्यात चर्चा सुरू

मुंबई : चित्रीकरणासाठी राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर टेलीविश्वात एकच लगबग सुरू झाली आहे. गेले दोन दिवस मराठी आणि हिंदीतील टेलीव्हिजन वाहिन्यांचे प्रमुख आणि निर्माते यांच्यात बैठका सुरू आहेत. लवकरात लवकर चित्रीकरणासाठी परवानगी कशी मिळवायची, सुरक्षेच्या उपाययोजनांसंबधी मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन नव्याने तयारी कशी करता येईल? याशिवाय, चित्रीकरणाचे बजेट किती वाढेल? अशा बारीकसारीक तपशिलांवर सध्या चर्चा सुरू आहे.

दोन महिन्यांनंतर चित्रीकरणाला परवानगी मिळाली असल्याने कोणतीही चूक न होता चित्रीकरण पूर्ववत सुरू होणे ही आत्ताची गरज आहे आणि त्यासाठीच काटेकोर नियोजन सुरू असल्याची माहिती निर्माता नितीन वैद्य यांनी दिली.

राज्य सरकारने रविवारी मालिका-चित्रपटांच्या चित्रीकरणाला परवानगी देतानाच सेटवर प्रत्येक विभागाला काय काय नियम पाळावे लागतील, यासंदर्भातील वीस पानी मार्गदर्शक सूचनाही जाहीर के ल्या आहेत. या सूचनांनुसार सेटवर मालिके तील कलाकारांबरोबर के वळ ३३ टक्के इतर तंत्रज्ञ आणि सदस्य यांच्याबरोबरीने चित्रीकरण करायचे आहे. सेटवर सॅनिटायझेशन, डॉक्टर-परिचारिका-रुग्णवाहिका यांची सोय करावी लागणार आहे. हे सगळे कसे करायचे? यासंबंधी निर्मात्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. सध्या त्यावर चर्चा करून चित्रीकरण लवकरात लवकर सुरू करण्यासाठी तयारी के ली जात आहे. यासाठी पहिल्यांदाच हिंदी आणि मराठीतील सगळ्या निर्मात्यांचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती नितीन वैद्य यांनी दिली. तर सरकारने चित्रीकरणासाठी लवकर परवानगी मिळावी यासाठी चांगले नियोजन के ले आहे. सध्या चित्रपटांना चित्रीकरण करायचे असेल तर निर्मात्यांनी चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे अर्ज करायचे आहेत. मालिकांच्या चित्रीकरणासाठी ब्रॉडकास्टर्सनी परवानगी मिळवायची आहे. तर वेबमालिकांच्या चित्रीकरणासाठी संबंधित ओटीटी कं पन्यांनी परवानगीसाठी अर्ज करायचा आहे. याशिवाय जे सेट्स मुंबईबाहेर आहेत त्यांना त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळवणे सोपे होणार आहे, अशी माहिती निर्माता-अभिनेता आदेश बांदेकर यांनी दिली. त्यानुसार मराठी आणि हिंदीतही ब्रॉडकास्टर्सनी पत्रव्यवहार सुरू के ला आहे, मात्र खरे आव्हान आहे ते मार्गदर्शक तत्त्वे सांभाळून चित्रीकरण करण्याचे. त्यातही ही तयारी करत असताना पावसाचे दिवस, चक्रीवादळाचा तडाखा या सगळ्याचाही निर्मात्यांना विचार करावा लागणार आहे. पहिल्यांदाच कमीतकमी माणसांमध्ये जास्तीत जास्त चित्रीकरण कसे करता येईल, याचे सर्जनशील नियोजन निर्माते आणि वाहिन्यांना मिळून करावे लागणार आहे, अशी माहिती बांदेकर यांनी दिली. परवानगी मिळवून सेटची पूर्ण तयारी पुढच्या १० ते १५ दिवसांत करून चित्रीकरण सुरू व्हावे, यासाठी निर्माते आणि वाहिन्यांचे युद्धपातळीवर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

नियमांचा फे रविचार करण्याची आयएफटीडीची मागणी

६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कलाकारांना चित्रीकरणास परवानगी न देण्याच्या नियमाबाबत फेरविचार करण्याची मागणी ‘इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हिजन असोसिएशन’ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. तसेच सध्या करोनासाठी डॉक्टरांचा तुटवडा भासत असल्याने चित्रीकरण स्थळी वैद्यकीय पथक ठेवण्याच्या मागणीचा फेरविचार करण्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.  याचबरोबर देशात करोनाबाधित रुग्णांचे वाढते प्रमाण आणि मर्यादित डॉक्टर-परिचारिकांची संख्या पाहता या कालावधीत प्रत्येक चित्रीकरण स्थळी वैद्यकीय पथक ठेवण्यापेक्षा त्या परिसरातील डॉक्टरांची मदत घेणे सोयीचे ठरेल, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.