रुग्णालयांत रांगा लागूनही २८ रुग्णांचीच नोंद
गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीतील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास गेल्याने सगळ्याच शासकीय व खासगी रुग्णालयांत विविध आजार असलेल्या लहान मुलांपासून वृद्ध वयोगटातील रुग्णांच्या रांगा वाढल्या आहे. उन्हापासून आजारी पडणाऱ्यांच्या नोंदी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून होणे अपेक्षीत असतांना त्यांच्याकडे केवळ २८ रुग्णांचीच नोंद असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तेव्हा आरोग्य विभाग उन्हापासून होणाऱ्या रुग्णांची लपवा- छपवी करीत असल्याची शंका वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्तकरीत आहे.
भारताच्या मध्यभागी असलेल्या नागपूरला प्रत्येक उन्हाळ्यात ४५ अंशाच्या पुढेच तापमान असते. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ होत आहे. मध्यंतरी तापमान काही अंशाने कमी झाले असले तरी तीन दिवसांत पुन्हा पारा चढला आहे. तापमान वाढल्यावर हलक्या तापासह गॅस्ट्रो, अतिसार यासह उन्हामुळे होणाऱ्या विविध आजारांचे रुग्ण नागपूरच्या सगळ्याच भागात वाढल्याचे दिसत आहे. नागपूरच्या मेडिकल, मेयो, आयसोलेशन रुग्णालयातच गेल्या दहा दिवसांत दीडशे गॅस्ट्रो वा त्यासदृष्य आजारांच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णांना उन्हापासून त्रास झाल्यास त्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे होणे अपेक्षित आहे. परंतु महापालिकेची उष्माघाताशी संबंधित रुग्ण नोंदवण्याची यंत्रणाच कुचकामी असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाला शहरातील मेडिकल, मेयोसह खासगी रुग्णालयांकडून असल्या प्रकारच्या बाह्य़रुग्ण विभागासह आंतरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची माहितीही दिली जात नाही. महापालिकेकडून स्वतच्या रुग्णालयात या रुग्णांकरिता चांगल्या पद्धतीची व्यवस्था करता येत नसतांनाच या रुग्णांची नोंदही करता येत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येत्या काळात नागपूर शहरासह विदर्भाच्या अनेक भागातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने हे रुग्ण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तेव्हा महापालिकेच्या वतीने ही लपवा-छपवी कायम राहणार वा त्यात सुधारणा केली जाणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या विषयावर नागपूर महापालिकेतील आरोग्य विभागाच्या डॉ. सविता मेश्राम यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

मेडिकल, मेयोतही नोंद नाही
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) या दोन्ही रुग्णालयांत रोज पाच हजारांच्या जवळपास लहान मुलांपासून वृद्ध गटातील रुग्ण उपचाराकरिता येतात. दोन्ही रुग्णालयांत रोज मोठय़ा संख्येने उन्ह लागल्याने त्रास होणारे उपचाराकरिता येतात. पैकी अनेकांवर बाह्य़रुग्ण विभागात उपचारही केले जातात. परंतु ते उपचाराकरिता रुग्णालयात दाखल होत नसल्याने त्यांना उन्हाशी संबंधित आजार असल्याच्या नोंदीच येथे होत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. तेव्हा या शासकीय रुग्णालयांना रुग्णांच्या अचूक नोंदीची शिस्त लागणार कशी? हा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत.