महापालिका आयुक्त-जिल्हाधिकाऱ्यांचे मत परस्परविरोधी

नागपूर: शहर आणि ग्रामीणमध्ये रोज मोठय़ा प्रमाणात वाढणारी करोनाची रुग्णसंख्या रोखण्यासाठी पुन्हा टाळेबंदी लागू करण्याच्या पर्यायावर सध्या विचार सुरू असला तरी या मुद्यावर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यात एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांनी नियम न पाळल्यास व गर्दी कमी न झाल्यास पुन्हा टाळेंबंदीचा विचार केला जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकताच दिला तर ग्रामीण भागात सध्या शेतीची कामे सुरू असल्याने व रुग्णसंख्याही नियंत्रणात असल्याने टाळेबंदीची बिलकुल गरज नाही, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ापासून अडीच महिने कडकडीत टाळेबंदी पाळूनही नागपूरमधील बाधितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. एक जूनपासून टाळेबंदीत शिथिलता दिल्यावर त्यात मोठय़ा संख्येने वाढ होऊ लागली आहे. आतातर ग्रामीण भागातही  लोण पसरले आहे. ते रोखण्यासाठी राज्यातील काही महापालिकांनी पुन्हा टाळेबंदीचा पर्याय स्वीकारला आहे. नागपूरमधील वाढती संख्या लक्षात घेता येथेही टाळेबंदी लागू केली जाऊ शकते, अशी सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांनी नियम न पाळल्यास पुन्हा टाळेबंदी लागू करावी लागेल असा इशारा दिला आहे. एरवी आयुक्तांच्या प्रत्येक निर्णयावर टीका करणारे महापौर संदीप जोशी यांनीही लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घ्या असे सांगून एकप्रकारे आयुक्तांच्या निर्णयाविषयी सहमतीच दर्शवली आहे.

दुसरीकडे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मात्र टाळेबंदीला प्रखर विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या पेरणीचे दिवस आहेत. मोठय़ा प्रमाणात मजूर शेतावर काम करीत आहे.

अशा स्थितीत टाळेबंदीचा निर्णय घेतल्यास त्याचा फटका शेतकऱ्यांना बसेल. तसेच शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढीचा वेग मर्यादित आहे. त्यामुळे टाळेबंदी लागू केली जाणार नाही.

शहरात आणि ग्रामीण भागातही करोना संसर्ग रोखण्यासंदर्भात काळजी घेण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील सीमावर्ती भागात करोनाची साथ नाहीच असे मानून लोक दुकानात आणि रस्त्यावर गर्दी करू लागले आहेत.

ग्रामीण भागात सध्या शेतीची कामे सुरू आहेत. पेरण्यांना वेग आला आहे. अशा स्थितीत टाळेबंदी लागू करणे योग्य ठरणार नाही.

– रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी, नागपूर.

 

करोना रुग्णसंख्या (रविवापर्यंत)

*  नागपूर शहर –    १८७९

*  ग्रामीण व इतर – ३५५

एकूण –          २२३४