News Flash

एकाच रुग्णाला तब्बल १२ रेमडेसिविर देण्यावरून वाद!

नेल्सन रुग्णालयात एका रुग्णाला तब्बल १२ रेमडेसिविर इंजेक्शन दिल्याचे देयकात दाखवले जात आहे.

नेल्सन रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

नागपूर : नागपूरसह राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने एक- एक इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाईकांनी शेजारच्या जिल्ह्यायांसह परराज्यही गाठले. काहींना एका इंजेक्शनसाठी  २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत मोजावे लागले. अशा स्थितीतही धंतोली परिसरातील नेल्सन रुग्णालयात एका रुग्णाला तब्बल १२ रेमडेसिविर इंजेक्शन दिल्याचे देयकात दाखवले जात आहे. हा प्रकार रुग्णांकडून अवास्तव शुल्क आकारण्यासाठी अथवा जास्त इंजेक्शन लावून रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा असल्याचे सांगत नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

मिलिंद कन्नमवार असे तक्रारकत्र्याचे नाव आहे. तो राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्र्यांचा स्विय सहाय्यक असून त्याचे करोनाने गंभीर झालेले सासू व सासरे धंतोलीतील नेल्सन रुग्णालयात दाखल होते. पैकी एकाचे उपचारादरम्यान निधन झाले. परंतु दुसऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून तब्बल १२ रेमडेसिविर दिल्याचे रुग्णालयाकडून मिळालेल्या देयकात  दाखवले जात आहे. प्रत्यक्षात नागपुरातील बऱ्याच रुग्णालयांत एका रुग्णाला सहा ते सात रेमडेसिविर इंजेक्शनहून अधिक मात्रा दिली जात नाही. त्यानंतरही येथे तब्बल १२ इंजेक्शन  कसे? हा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. सोबत कन्नमवार यांच्या नातेवाईकाने तक्रारीत शासनाने रेमडेसिविरचे ४ हजार ८६० रुपये निश्चित केले असतांना येथे त्याचे प्रती इंजेक्शन ५ हजार ४०० रुपये लावण्यात आल्याचेही नमूद केले आहे. तर रुग्णालयाकडून देयकातही शासनाच्या नियमांची पायामल्ली करत अतिरिक्त शुल्क लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोबत येथे दोनपैकी एक रुग्ण सामान्य वार्डात असतानाही त्यालाही अतिदक्षता विभागाचे शुल्क लावणे, रुग्णाला एकाच दिवशी मेक्रोक्रीट नावाचे तीन इंजेक्शन दिल्याचेही  तक्रारीत नमूद आहे. या विषयावर प्रसिद्धीमाध्यमांनी रुग्णालयातील डॉ. समीर दासरवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी कितीही इंजेक्शन लावण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. एकाच दिवशी तीन इंजेक्शन लावल्याचा आरोप मात्र त्यांनी फेटाळला. आपण केवळ रुग्णालयात सेवा देत असून देयकाबाबत रुग्णालय प्रशासनच आपल्याला सांगू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 12:05 am

Web Title: dispute over giving twelve remedies to a single patient akp 94
Next Stories
1 मुख्याध्यापक, लिपिकाला  लाच घेताना रंगेहाथ पकडले
2 पीएच.डी. मार्गदर्शकांची कमतरता दूर करण्यासाठी नवी नियमावली
3 ४५ वर्षांवरील नागरिकांचे आजही लसीकरण नाही
Just Now!
X