जिचकार यांच्या स्वीकृत सदस्यत्वावर शिक्कामोर्तब

स्वीकृत सदस्य कोणाला करायचे यावरून काँग्रेसमधील दोन गटात कालपर्यंत सभागृहाबाहेर सुरू असलेला वाद आज महापालिकेच्या सभेत उफाळून आला. दोन गटातील वादावादीमुळे सत्ताधारी भाजपचे चांगलेच मनोरंजन झाले. दरम्यान, आज महापौर नंदा जिचकार यांनी काँग्रेसच्या बंडखोर गटाच्या किशोर जिचकार यांची स्वीकृत सदस्य म्हणून घोषणा केली. त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेणारी काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांची याचिका न्यायालयाने कालच फेटाळल्याने जिचकार यांचा मार्ग मोकळा झाला होता.

शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर स्वीकृत सदस्य नियुक्तीचा विषय चर्चेला आला. विकास ठाकरे हे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत तसेच जिचकार यांच्याकडे पक्षाचे अधिकृत पत्र नाही, त्यामुळे हा विषय स्थगित ठेवावा, अशी मागणी काँग्रेसचे संजय महाकाळकर यांनी केली. त्याला काँग्रेस बंडखोर गटाचे प्रफुल्ल गुडधे यांनी विरोध केला. सर्वोच्च न्यायालयात जाण्यास विरोध नाही. मात्र, तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे काहीच कारण नाही. महापालिकेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्युसिपल पार्टी असे नाव आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष वेगळे आहेत. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. संदीप सहारे आणि मनोज सांगोळे यांनी जिचकार यांच्या निवडीला विरोध करीत आक्षेप नोंदवले.

दरम्यान, काँग्रेसमधील दोन गटातील आरोपप्रत्यारोपानंतर सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी महापौरांना या विषयाला मंजुरी देण्याची विनंती केली. त्यानंतर महापौरांनी किशोर जिचकार यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी सभागृहाबाहेर उपस्थित त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत जल्लोश केला.

जिचकारांचा प्रवेश तर वनवे अडचणीत..

विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी शिफारस केलेल्या किशोर जिचकार यांची स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत प्रवेश झाल्यानंतर वनवे गटात आनंदाला उधान आले असले तरी वनवेंच्या विरोधात पाच समर्थकांनी बंडाचे निशान फडकवल्यामुळे त्यांची पुढील वाटचाल खडतर आहे. नाराज समर्थकांनी वेट अ‍ॅण्ड वॉच, अशी भूमिका घेतली असली तरी भविष्यात आपण वेगळी चूल मांडू शकतो, असा अप्रत्यक्ष इशारा काहींनी दिल्याने वनवेंचे ‘टेन्शन’ वाढले आहे. काँग्रेसच्या २९ पैकी १६ नगरसेवकांनी प्रगती भवनात बैठक घेतली होती त्यात वनवे यांची निवड पक्षनेता म्हणून करण्यात आली होती. त्यावेळी सर्व समर्थक नगरसेवकांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र जिचकार यांचे नाव निश्चित करताना कुणालाच विश्वासात न घेतल्याने नाराजी आहे. नाराजांची संख्या पाचपेक्षा अधिक आहे. त्यांनी वेगळी चूल मांडल्यास वनवेंचे विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येण्याची शक्यता आहे.

वनवेंनी विश्वासात घेतले नाही; सहारे, सांगोळे यांचा आरोप

विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत काँग्रेसच्या बंडखोर गटाने न्यायालयीन लढाई जिंकून त्यांच्या गटाचे किशोर जिचकार यांना स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त करण्यात यश मिळवले असले तरी या गटातही आलबेल नाही हे सभागृहातच स्पष्ट झाले. या गटातील संदीप सहारे आणि मनोज सांगोळे या दोन काँग्रेस नगरसेवकांनी गटनेते तानाजी वनवे यांच्यावरच हल्लाबोल करीत ते नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. जिचकार यांचे नाव निश्चित करतानाही आम्हाला विचारण्यात आले नाही, असे सांगत त्यांनी जिचकार यांच्या नियुक्तीलाच विरोध केला.