महापालिकेच्या प्रस्तावाला अप्रत्यक्ष विरोध

नागपूर :  नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून मोफत करण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी किंवा लस खरेदीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा इतर कोणत्याही खाजगी संस्थांनी निधी गोळा करू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

मागच्या आठवड्यात महापौर दयाशंकर तिवारी यांनी महापालिकेला लस खरेदीसाठी शासनाने परवानगी द्यावी, असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते तसेच लस खरेदीसाठी लोकप्रतिनिधींकडून निधी गोळा करण्याचे सूतोवाच त्यांनी के ले होते. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी केलेले आवाहन  हे महापालिकेच्या प्रस्तावाला शासनाचा अप्रत्यक्ष विरोध असल्याचे संकेत देणारे आहे.

विभागीय आयक्तांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार नागपूर विभागात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ४५ वर्षांवरील नागरिकांना तसेच १८ वर्षांवरील नागरिकांना नि:शुल्क लस देण्यात येत आहे. यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या केंद्रावर कुठेही शुल्क आकारण्यात येत नाही. त्यामुळे लसीकरणासाठी कोणीही निधी गोळा करू नये, असे आवाहन यावेळी डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

करोनाबाधित तसेच इतर रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध नोंदणीकृत संस्था, सामाजिक संस्था, खाजगी तसेच नोंदणीकृती आस्थापनाकडून आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात येत आहे. या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात

पुढाकार घेतला आहे. अशा कामासाठी गोळा केलेला निधी खर्च करता येऊ शकतो. परंतु लसीकरणासाठी अथवा लस खरेदीसाठी निधी गोळा करू नये. यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे लस उपलब्ध करुन देण्यात असल्याचे विभागीय आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.