उच्च न्यायालयाचे निरीक्षण, घटस्फोटाचा अर्ज मंजूर

पती नपुंसक नसताना त्याला वारंवार नपुंसक म्हणून हिणवणे चुकीचे आहे. असे आरोप पुरुषी अहंकाराला ठेच पोहोचविणारे असून, एकप्रकारे पत्नीकडून होणारी ही क्रुरताच आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका घटस्फोटाच्या प्रकरणात नोंदविले आहे.

स्वप्ना आणि राजेश (नाव बदललेली) असे या दाम्पत्याचे नाव आहे. स्वप्ना मूळची हिंगणघाटची असून, राजेश येथील नंदनवन परिसरातील आहे. राजेश स्वत:चा खासगी व्यवसाय करतो. २४ सप्टेंबर २००७ ला दोघांचा हिंगणघाटलाच हिंदू रितीरिवाजानुसार विवाह झाला. त्यानंतर स्वप्ना पतीसोबत नागपुरात राहू लागली. राजेशला आई आणि बहीण असे संयुक्त कुटुंब आहे, परंतु स्वप्नाला नवऱ्यासोबत वेगळे राहायचे असल्याने काही दिवसांनी ती नवऱ्यामागे सासू व नणंदेपासून वेगळे राहण्याचा आग्रह करू लागली. परंतु, वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि बहिणीचा आधारच नसल्याने राजेशने पत्नीला नकार दिला. त्यानंतर पत्नीने घरातील कामे करणे बंद केले आणि सासू व नणंदेशी ती भांडू लागली, त्यामुळे घरातील वातावरण बिघडत गेले. त्यानंतर ती राजेश्वरवर नपुंसक असल्याचे आरोप करू लागली. असे सातत्याने होत असल्याने राजेश दुखावला गेला. शिवाय, एक दिवस स्वप्नाने नणंदेशी भांडण केल्याने सासूला ह्रदयविकाराचा झटका आला. सासू व नणंद रुग्णालयात असताना स्वप्ना घरची जबाबदारी सोडून माहेरी जाण्याचा आग्रह करू लागली. त्यानंतर ती वडिलांसह माहेरी निघून गेली.

या सर्व प्रकारानंतर राजेशने दोन्ही पक्षांची बैठक बोलविली होती. त्यावेळी स्वप्नाने सासरच्या मंडळींना त्रास देणार नाही व घरची कामे नियमितपणे करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी स्वपा्न पूर्ववत वागू लागली, त्यामुळे तिच्या आग्रहावरून राजेशने १५ सप्टेंबर २००९ ला स्वप्नाला तिच्या माहेरी सोडून दिले आणि कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायाधीशांनी पत्नीकडून क्रुरता झाल्याने राजेशचा घटस्फोट मंजूर केला. त्या आदेशाविरुद्ध स्वप्नाने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर न्या. वासंती नाईक आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाचा निकाल योग्य ठरवून स्वप्नाची अपील फेटाळून लावली.

पत्नीच्या वडिलांची ढवळाढवळ चुकीची

पत्नीच्या घरच्यांनी कुटुंबात अनावश्यक ढवळाढवळ करणे चुकीचे आहे. जावयाच्या वडिलांचा नुकताच मृत्यू झाला असल्याची माहिती असताना संपत्तीवर स्वत:चे नाव टाकण्याचा आग्रह धरणे हा पत्नीच्या वडिलांचा आग्रह चुकीचा आहे. याशिवाय, स्वप्नाविरुद्ध करण्यात आलेले आरोप तिला खोडून काढण्यात अपयश आले असून नवऱ्याने केलेल्या आरोपांची सर्व साक्षीदारांनी पुष्टी केली असल्याने घटस्फोटाचा निर्णय योग्यच आहे, असे न्यायालयाच्या निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे.