इटारसीतील प्रकरणात नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
महाविद्यालयीन जीवनात प्रेमात पडलेल्या दोघांनी घरच्यांना अंधारात ठेवून आर्य समाज मंदिरात गुपचूप लग्न केले. लग्नानंतर ते जोडपे परत आपापल्या कुटुंबीयांसह राहू लागले. मंदिरात लग्न केल्यानंतर ते कधीच एकत्र न आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन वर्षांपेक्षा अधिक काळ विभक्त राहिल्याच्या नियमाखाली त्यांचा विवाह मोडीत काढून मुलीला घटस्फोट मंजूर केला.
आईवडिलांना अंधारात ठेवून गुपचूप लग्न करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. या पाश्र्वभूमीवर नागपूर खंडपीठाच्या न्या. वासंती नाईक आणि न्या. प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय महत्वपूर्ण आहे. अर्चना (नाव बदललेले) ही काही वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील इटारसी येथे आईवडिलांसह राहात होती. दरम्यान, ती तेथील एमजीएम महाविद्यालयात शिकत असताना इटारसी येथील आणि त्याच महाविद्यालयात व्यवस्थापन अभ्यासक्रमाला शिक्षण घेणाऱ्या प्रवीण (नाव बदललेले) नावाच्या युवकाशी परिचय झाला. परिचयातून मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, २५ एप्रिल २००८ रोजी त्यांनी इटारसी येथील आर्य समाज मंदिरात लग्न केले. लग्नानंतर पुन्हा ते आपापल्या कुटुंबीयांसह राहू लागले.
गेल्या २००९ मध्ये अर्चना आपल्या आईवडिलांसह नागपूरला निघून आली. दरम्यान, तिच्या आईवडिलांनी तिचा विवाह एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलाशी जुळवल. याची माहिती प्रवीणला समजल्यावर जुलै २०१० मध्ये प्रवीणने अर्चनाच्या वडिलांशी संपर्क साधून ‘अर्चना आणि त्याचा विवाह झाला असून त्यांनी जर अर्चनाचा विवाह दुसऱ्याशी करण्याचा प्रयत्न केला तर ती आणि तिचा होणारा नवरा सोबत राहू शकणार नाही’ अशा शब्दात धमकी दिली. यानंतर तो अर्चनालाही बदनाम करण्याची धमकी देऊ लागला. या प्रकारानंतर अर्चनाने आपल्या कुटुंबीयांना सर्व हकिकत सांगितल्यावर तिच्या कुटुंबीयांनी इटारसीच्या आर्य समाज मंदिरातून प्रवीण आणि अर्चनाच्या विवाहाचे प्रमाणपत्र मिळविले असता त्यांचे लग्न झाले असल्याचे स्पष्ट झाले.
परंतु आता अर्चनाला प्रवीणसोबत राहायचे नसल्यामुळे तिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. कौटुंबिक न्यायालयाने तिचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळून लावला. अर्चनाने उच्च न्यायालयात धाव घेऊन कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले. या प्रकरणाची सुनावणी न्या. वासंती नाईक आणि न्या. प्रसन्न वराळे यांच्यासमक्ष झाली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने अर्चनाच्या बाजूने निकाल देऊन घटस्फोटाची मागणी मान्य केली.

कमी वयात नवीन सुरुवात करता येईल
अर्चनाच्या युक्तिवादानुसार, प्रवीणने लग्नासाठी आपल्यावर बळजबरी केली होती. इच्छा नसतानाही आपण आर्य समाज मंदिरात त्याच्याशी लग्न केले आणि दस्तावेजांवर स्वाक्षरी केली, परंतु लग्नानंतर आपण एकही मिनीटही त्याच्यासोबत राहिलो नाही किंवा सहवास केला नाही. लग्नापासून आपापल्या कुटुंबीयांसोबतच राहिले. शिवाय, प्रवीणने आपल्याला दुसऱ्याशी लग्न केल्यास बघून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे क्रुरता आणि परित्याग या नियमांखाली घटस्फोट मंजूर करण्याची मागणी केली.
अर्चनाची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने अर्चना आणि प्रवीणचे २५ ते २८ च्या घरात वय असल्याने त्यांना नवीन सुरुवात करता येईल, हा मुद्दा विचारात घेऊन हिंदू विवाह कायद्याच्या परित्याग या कलमाखाली घटस्फोट मंजूर केला.