|| महेश बोकडे

नागपूर जिल्ह्य़ातील स्थिती; परिवहन खात्याच्या ‘सारथी’ची माहिती : –  दिवाळी तोंडावर नागपूर जिल्ह्यत गेल्यावर्षीच्या तुलनेत सर्वच संवर्गातील वाहन विक्रीत २५ टक्क्यांहून अधिक घट नोंदवली गेली आहे. परिवहन खात्याच्या सारथी सॉफ्टवेअरमधील माहितीनुसार दहा दिवसात केवळ ४,६३७ नवीन वाहन विक्री झाल्याने वितरकांची चिंता वाढली आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि मंदीचा वाहन व्यवसायाला फटका बसल्याचे बोलले जात आहे.

नागपूर जिल्ह्य़ात शहर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर ग्रामीण अशी तीन आरटीओ कार्यालये आहेत. सहसा दिवाळीच्या मुहूर्तावर वाहने खरेदीदारांची संख्या वाढते. गेल्यावर्षीही संख्या रोडावली होती. त्यात यंदा पुन्हा घट झाली आहे. वाहन क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी मोठय़ा संख्येने ग्राहक पैसे भरून वाहनाची नोंदणी करून ती दिवाळीच्या मुहूर्तावर उचलणार असल्याचे सूचित करतात. गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी दहा दिवसांत जिल्ह्य़ात सर्व संवर्गातील ४,६३७ वाहनांची नोंद झाली होती.

प्रत्येक वर्षीच्या तुलनेत ती कमी होती. त्यातून शासनाला ११.०६ कोटींचा महसूल मिळाला होता. यंदा ही विक्री आणखी कमी होऊन ४ हजार ६३७ वर आली आहे. त्यामुळे शासनाला ११.०६ कोटींचा महसूल मिळाला आहे. यंदा दिवाळीच्या तोंडावर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीसह मंदीमुळे वाहनविक्री घटल्याचे सांगण्यात आहे. प्रत्येक वर्षी वाहन विक्रीचा आलेख कमी होत असल्याने जिल्ह्य़ातील अनेक शोरूममधून अनेक कर्मचाऱ्यांची कपात केल्याने बेरोजगारीची वेळ आली आहे.

दिवाळीच्या बोनसला कात्री!

प्रत्येक दिवाळीत शहरातील वाहन विक्रेत्यांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात दिवाळी बोनस दिला जातो. परंतु यंदा विक्री घटल्यामुळे अनेक विक्रेत्यांनी यंदा बोनसच्या रकमेला कात्री लावली अथवा ते न देण्याचाही निर्णय काहींनी घेतल्याची माहिती विविध शो-रूममध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दिली.

‘‘गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन विक्री कमी झाली असली तरी लवकरच ती वाढण्याची आशा आहे. शेवटी मंदीचा परिणाम कधीतरी ओसरणारच आहे. सध्या टीव्हीएससह इतरही कंपनीच्या नवीन उत्पादनांना मागणी वाढत आहे.’’ – ए. के. गांधी, वाहन विक्री उद्योजक, नागपूर.

वाहन विक्रीची स्थिती

२७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१८

कार्यालय                  दुचाकी          चारचाकी       इतर              महसूल (कोटीत)

नागपूर (श.)              ०६०१          २०४             १२६              ७.१५

नागपूर (ग्रा.)              १८५४         २००             २२६             ५.९२

पूर्व नागपूर                २५५२           २०४            २३६             ७.१५

 

वाहन विक्रीची स्थिती

१३ ते २२ ऑक्टोबर २०१९

कार्यालय                  दुचाकी          चारचाकी       इतर              महसूल (कोटीत)

नागपूर (श.)              १००६          १८७             १४५             ४.२२

नागपूर (ग्रा.)             ७३६             १८३             १८५             ३.९५

पूर्व नागपूर                १९६८          १८४             १४५             ३.९५