वायू प्रदूषणाने १०० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरची सीमा ओलांडली

नागपूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाके  कमी फु टतील आणि प्रदूषण कमी होईल ही अपेक्षा खोटी ठरली आहे. यंदाही नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात फटाके  फोडले असून १२ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत शहरातील वायू प्रदूषणाने १०० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरची सीमा ओलांडली. व्हीएनआयटीने (विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तांत्रिक संस्था) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानंतर  के लेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

सिव्हिल लाईन्स येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातील केंद्रानुसार हवा गुणवत्ता १२७, उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स येथील केंद्रात १२३, सदर येथील शासकीय तंत्रनिके तन महाविद्यालयातील केंद्रात १२४ आणि हिंगणा एमआयडीसी मार्गावरील केंद्रात हवा गुणवत्ता १०२ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकी नोंदवण्यात आली. हवेतील गुणवत्ता १०० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटरपेक्षा अधिक असणे धोक्याचे लक्षण आहे.

दिवाळीआधी चांगली हवा

दिवाळीच्या दिवशी १४ नोव्हेंबरला फटाक्यांमुळे शहरातील प्रदूषणात वाढ आढळून आली. व्हीएनआयटीने के लेल्या सर्वेक्षणातच एप्रिल २०२० मध्ये गेल्या पाच वर्षातील शहरातील हवेचे प्रदूषण नाहीच्या बरोबर होते. दिवाळीच्या आधीपर्यंत हवेची गुणवत्ता चांगली होती. सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सूक्ष्म धूलिकणांवरून हवेची गुणवत्ता तपासता येते. राष्ट्रीय वातावरणीय हवा गुणवत्ता मानकानुसार सल्फर व नायट्रोजनची सीमा ८० मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर आणि सुक्ष्म धुलीकणांची सीमा १०० इतकी असते. यात वाढ होणे म्हणजे आरोग्यावर दुष्परिणाम होणे आहे.