रुग्णालय प्रशासनाकडून प्रस्तावाची चाचपणी

केंद्रीय अर्थसंकल्पात प्रत्येक मोठय़ा जिल्हा व विमा रुग्णालयात ‘डीएनबी’ अभ्यासक्रमाची घोषणा झाली आहे. डागा शासकीय स्मृती रुग्णालयाचा दर्जा सुधारल्यास तेथे हा अभ्यासक्रम शक्य आहे. रुग्णालय प्रशासनाकडून ‘डीएनबी’ करिता चाचपणीही सुरू झाली आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाल्यास संस्थेला एमबीबीएसचे विद्यार्थी मिळणार असल्याने रुग्णांना अद्ययावत सेवा मिळणे शक्य होईल.

मध्य भारतातील ‘मेडिकल हब’ म्हणून नागपूरकडे बघितले जाते. शहरात वैद्यकीय शिक्षण विभागाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), सुपरस्पेशालिटी रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय या संस्थांसह सार्वजनिक आरोग्य विभागाचे डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय, विमा रुग्णालय या शासकीय संस्था आहेत. अनेक वर्षांपूर्वी येथील जिल्हा रुग्णालयाचे मेयोत रूपांतर झाल्यावर येथे नवीन जिल्हा रुग्णालय झाले नाही. शासनाकडून जिल्हा रुग्णालयाची बऱ्याचदा घोषणा झाली, परंतु प्रशासकीय मंजुरीपलीकडे काहीच झाले नाही.

डागा रुग्णालयामध्ये रुग्णांचा भार जास्त असून तेथे काही वर्षांपूर्वी सीपीएस हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू झाला. त्यानुसार येथे स्त्रीरोग व प्रसूती (२ जागा), बालरोग विभाग (४), ब्लड ट्रान्सफ्यूजन (२), पॅथॉलॉजी (२), भूलविभाग (३), नेत्ररोग विभाग (२) या विषयांचे अभ्यासक्रम सुरू आहेत. एमबीबीएस झालेले विद्यार्थी पदव्युत्तर पदविका करीत असल्याने निश्चितच येथे डॉक्टरांची संख्या वाढून रुग्णांनाही लाभ होत आहे.

डागात डीएनबी या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी बरेच निकष पूर्ण करण्यात आले असून केवळ दर्जा सुधारण्यासाठी ‘एनएबीएस’कडून दर्जा वाढवण्याची गरज आहे. त्याकरिता संस्थेत रुग्णसेवेसाठी बरीच यंत्रसामुगी उपलब्ध करावी लागेल. निश्चितच त्यामुळे रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सेवा मिळतील.

डागा प्रशासनाकडून डीएनबी अभ्यासक्रमाकरिता तातडीने दर्जा सुधारण्याकरिता आवश्य बाबींसह कर्मचारी व इतर प्रस्ताव पाठवण्याची चाचपणी सुरू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षीका डॉ. सीमा पारवेकर यांनी दिली.

विदर्भाला ३५० पदव्युत्तर जागांचा लाभ

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या समितीने काही महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या निरीक्षणात नागपूरच्या मेडिकल व मेयो या दोनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे १७०, तर अकोला, यवतमाळ येथेही १८० च्या जवळपास पदव्युत्तर जागा वाढणे शक्य असल्याचे निदर्शनास आले होते.

गोंदिया व चंद्रपूरला नुकतेच महाविद्यालय सुरू झाल्याने येथे मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रम त्वरित सुरू होणे शक्य नाही. तेव्हा केंद्रीय अर्थसंकल्पात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम वाढवण्याची घोषणा झाल्याने या प्रस्तावाला तातडीने हिरवा कंदील मिळण्याची आशा आहे.

जेनेरिक औषधालय कधी?

राज्य शासनाने प्रत्येक शासकीय रुग्णालयात जेनेरिक औषधालय सुरू करण्याची घोषणा केली होती. नागपूरच्या मेडिकल, मेयो, डागा येथे अद्याप ते सुरू झाले नाही. या प्रकाराने या संस्थेत उपलब्ध नसलेली औषधे रुग्णांना बाहेरून आणावी लागत असल्याने सर्वसामान्यांना मनस्ताप होतो.

जिल्हा रुग्णालयही सुरू करा

केंद्र सरकारने वैद्यकीयच्या पदव्युत्तर जागांमध्ये वाढ, प्रत्येक जिल्हा रुग्णालयात डीएनबी अभ्यासक्रमासह अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या असून त्याचे स्वागत आहे. परंतु मागास, आदिवासीबहुल भागात सेवा देणाऱ्या शासकीय डॉक्टरांना अद्यापही राहण्यासह पायाभूत सुविधा मिळत नसून त्यावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. शहरातील नागरिकांना आरोग्य विभागाच्या सगळ्या सुविधा मिळाव्या म्हणून तातडीने जिल्हा रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे.

डॉ. प्रमोद रक्षमवार, राज्य सरचिटणीस, राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, नागपूर.