दोघांना अटक; पोलिस कोठडी, म्होरक्या फरार
तोतया पोलिस अधिकारी बनून ‘डीएनआर’ या स्वत:च्याच ट्रॅव्हल्सवर छापा मारून प्रवाशांची दारू लुटायची व पैशाची मागणी केल्याबद्दल पडोली पोलिसांनी हिरासिंग हरबन सिंग व गुरूबच्चनसिंग डिजे सिंग बावरे या दोघांना अटक केली. त्यांची सोमवापर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली असून डीएनआर समूहाचे परमजीतसिंग फरार झाले आहेत.
येथील डीएनआर समूहाच्या वतीने नागपूर-चंद्रपूर व चंद्रपूर-नागपूर खासगी बससेवा सुरू आहे. ही ट्रॅव्हल्स कंपनी सुरू झाली तेव्हापासूनच या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरली आहे. आता तर डीएनआर समूहाचे परमजीतसिंग व इतर तीन कर्मचारी डीएनआरच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांनाच पोलिस अधिकारी असल्याचे सांगून लुटत असल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे. पडोलीचे ठाणेदार क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील राजेश सोनी यांनी नागपुरातून २७ हजाराची देशी दारू खरेदी केली. ते डीएनआरच्या बसने चंद्रपूरला परत येत असतांना परमजितसिंग, हिरासिंग हरबन सिंग व गुरूबच्चनसिंग डिजे सिंग बावरे यांनी शनिमंदिराजवळ गाडी थांबवून तपासणी केली. यात सोनी यांच्याकडे विदेशी मद्य सापडले. पोलिस अधिकारी असल्याचे भासवून परमजितसिंग व सहकाऱ्यांनी दारू तर स्वत: जवळ ठेवून घेतलीच, पण सोनी यांच्याकडे प्रकरण दाबण्यासाठी १५ हजाराचा लाच मागितली. मात्र, सोनी यांच्या चलाखीने परमजीतसिंग व सहकारी पोलिस अधिकारी असल्याचे भासवून प्रवाशांची अशा प्रकारे लुट करीत असल्याचे उघड झाले.
दरम्यान, हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाख व पडोलीचे ठाणेदार क्षीरसागर यांच्यापर्यंत गेले. पडोली पोलिसांनी या प्रकरणी हिरासिंग हरबन सिंग व गुरूबच्चनसिंग डिजे सिंग बावरे या दोघांना अटक केली असून त्यांना आज जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची सोमवापर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली. मुख्य सूत्रधार व डीएनआर समूहाचे परमजीतसिंग फरार आहेत. पोलिस परमजीतसिंगचा चौफेर शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, परमजितसिंग यांनी डीएनआर गाडीतून प्रवास करणाऱ्या बहुसंख्य प्रवाश्यंना अशाच पध्दतीने लाखो रुपयांनी लुटल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. ट्रॅव्हल्स कंपनीच्याच लोकांना अटक झाल्यामुळे दारू विक्रेते आणि ट्रॅव्हल्स कंपनीतील साठगाठहीा या निमित्ताने समोर आली आहे.