विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे धरणे

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात धरणे दिली. ‘भाजप-शिवसेना सरकार चले जाव’चे नारे दिले.

विधानभवन परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातून विरोधकांचा मोर्चा निघाला व सर्व आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर बसले. तेथे त्यांनी ‘खोटारडय़ा सरकारवर हल्ला बोल’, ‘मोदी सरकारवर हल्ला बोल’, ‘एकच बोल हल्ला बोल’, ‘शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ‘खोटे बोलून सत्तेवर आलेल्या सरकारचा धिक्कार असो’, ‘बेरोजगारी, महागाई वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ आदी घोषणा दिल्या. त्यांच्या हातातील घोषणा फलक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. त्यामुळे शासनाकडून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, तरुणांसह सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. सर्व विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा दिसत असल्याने सरकार त्यांचा आवाज दाबण्यासाठी ‘डल्लामार’ची धमकी देत आहे. मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांना विरोधी पक्ष घाबरणार नाही.