News Flash

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काळजीच नको!

आमचे सरकार संविधानाच्या विरोधात जाऊन कोणतेच काम करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

(संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

कै. राम गणेश गडकरी नाटय़नगरी

रवींद्र पाथरे, राम भाकरे

हल्ली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सातत्याने चर्चा होते, ती व्हायलाच हवी , वाद झाले पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, त्यातून विचारमंथन होत असते. आम्ही त्याचे स्वागत करतो. परंतु, या देशाच्या रक्तातच सहिष्णुता आहे , ती कुणीच घालवू शकत नाही.

अभिव्यक्ती  स्वातंत्र्याची काळजी करण्याची गरजच नाही, अशी ग्वाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या एका कार्यक्रमाप्रसंगी दिली.

या देशावर अनेक आक्रमणे झाली, ती आपण पचवली, अनेक बहिष्कृत, परिष्कृत येथे आले. त्यांना आपण सामावून घेतले, १९७५ साली एकदाच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला होता. परंतु आपण तो उलथून पाडला. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संबंधात कुणीही मनात किंतू ,परंतु आणू नये , गैरसमज करुन घेऊ नये. आमचे सरकार संविधानाच्या विरोधात जाऊन कोणतेच काम करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमच्या कामा संदर्भात काही मतभेद असतील  किंवा काही आशंका असतील तर जरुर टीका करावी. आम्ही ती सकारात्मक पद्धतीने घेऊ असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, केवळ नक्षलवादी साहित्य कुणाकडे सापडले म्हणून कारवाई केली जाणार नाही. परंतु, अशा तऱ्हेने देशद्रोही इराद्याने कुणी काही करीत असेल तर त्यांच्या विरोधात मात्र घटनेच्या चौकटीत जरुर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. रामदास आठवलेंसारखे समतेचे पाईक आमच्या सोबत आहेत. यातूनच काय ते समजा अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

३४ वर्षांनंतर नागपुरात नाटय़ संमेलन होत आहे. मराठी  रंगभूमीची समृद्ध परंपरा आणि वैदभिर्य जनतेने नेहमीच रंगकर्मीचे भरभरुन स्वागत केले आहे. जेव्हा केव्हा नाटय़कर्मी अडचणीत आले , तेव्हा तेव्हा विदर्भात त्यांनी प्रयोग सादर केले आणि येथील जनतेने दिलेल्या भरघोस प्रतिसादातून ते पुन्हा उभे राहिले. झााडीपट्टी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचा यावेळी त्यांनी गौरवाने उल्लेख केला.

९९ वे नाटय़ संमेलनाच्या आयोजनाचा मान नागपूरकरांना दिल्याबद्दल मुख्यमत्र्यांनी नाटय़ परिषदेचे आभार मानले. आणि येत्या शतकी नाटय़ संमेलनाचे आयोजन करण्याची संधी जर नागपूरकराना दिली तर ते आम्ही आनंदाने पार पाडू अशी ग्वाही त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2019 1:16 am

Web Title: do not worry about freedom of expression
Next Stories
1 ही तर कमालच झाली! तोतया पोलिसाने थेट क्राईम ब्रँचची शाखाच थाटली
2 धर्म शब्द उच्चारला तरी आज दचकायला होते – एलकुंचवार
3 आता विचारस्वातंत्र्य सेना काढावी काय?
Just Now!
X