नागपूर : ४९० ग्रॅम इतके वजन असलेल्या बालकाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. शहरात एवढय़ा कमी वजनाचा वाचलेला हा पहिलाच मुलगा असल्याचा दावा मंगळवारी डॉ. प्रवीण खापेकर यांनी केला. याप्रसंगी मुलाच्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

संगीता व दारासिंग टेकाम, मु. मंडला, मध्यप्रदेश असे बाळाच्या आई-वडिलांचे नाव आहे. त्यांना पहिली मुलगी असून दुसऱ्या मुलासाठीची जोखीम त्यांनी १६ वर्षांनंतर घेतली. ४६ वर्षांच्या संगीताला गर्भावस्थेच्या पाचव्या महिन्यातच रक्तदाबासह गर्भाशयात पाण्याची समस्या सुरू झाली. विविध गुंतागुंतीमुळे गर्भातील बाळाचा विकास थांबल्याचे पुढे आले. डॉक्टरांनी गर्भवतीची २६ आठवडय़ातच सिझरच्या मदतीने प्रसूती केली. बाळाचे वजन केवळ ४९० ग्रॅम होते आणि त्याला श्वासोच्छ्वासासह इतरही त्रास होता.

त्याला आस्था चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉ. प्रवीण खापेकर यांनी त्याच्यावर उपचार केले. आता तो दोन किलोचा झाला आहे.