नागपूर विभागातील रुग्णसंख्या २३८ वर

नागपूर : उपराजधानीत स्वाईन फ्लूचा विळखा घट्ट होत असून या रुग्णांवर उपचार करणाऱ्या मेडिकलच्या एका निवासी डॉक्टरलाही या आजाराने ग्रासले आहे. मेडिकलमध्ये या आजाराचे रुग्ण वाढले असताना अद्याप एकाही डॉक्टरने प्रतिबंधात्मक लस घेतली नाही. त्यामुळे येथे आणखी डॉक्टरांना हा आजार झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागपूर विभागात १ जानेवारी २०१९ पासून आजपर्यंत सातत्याने स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या सहा दिवसांमध्ये नागपुरातील विविध रुग्णालयांमध्ये या आजाराचे आठ रुग्ण दगावले असून त्यात पाच जण  शहरातील आहेत. या रुग्णांची संख्या आता थेट २३८ वर पोहोचली आहे. या भागात हे रुग्ण वाढत असतानाच मेडिकलच्या स्वाईन फ्लू कक्षाचे प्रशासनाकडून नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील रुग्ण शेजारच्या खोलीत ठेवले जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे, परंतु एक लहान मुलगा आणि इतरही काही रुग्ण इतरत्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याशिवाय रुग्णावर उपचार करणाऱ्या मेडिकलच्या एका निवासी डॉक्टरलाही या आजाराने ग्रासल्याचे पुढे आले आहे. प्रशासनाने केलेल्या चौकशीत येथील डॉक्टरांनी यंदा प्रतिबंधात्मक लसच घेतली नसल्याचे उघड झाले आहे.

लस घेण्यास टाळाटाळ

‘स्वाईन फ्लू’ या आजारावर नाकावाटे घेण्याची लस सध्या बाजारात उपलब्ध आहे, परंतु आरोग्य विभागाकडून टोचण्याचीच लस डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना उपलब्ध केली जाते. त्यातच लस टोचून घेतल्यास किंचित ताप, अंगदुखीसह इतरही त्रास संभवतात. त्यामुळे डॉक्टर ही लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी, त्यांच्याच जीवाला धोका उत्पन्न होत असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आरोग्य विभागाकडून यंदा मेडिकलला स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस उपलब्ध केली गेली नाही, हे विशेष.

‘‘नाकावाटे घेण्याच्या प्रतिबंधित लसींची मागणी अद्यापही कुणी केली नाही, परंतु टोचण्याच्या लसी उपलब्ध आहेत. एकाही निवासी डॉक्टरने अद्याप ती घेतली नसली तरी त्यांना ती घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जाईल.’’

– डॉ. योगेंद्र बनसोड, विभागप्रमुख, औषधशास्त्र विभाग.