लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये प्रवाशांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत असले तरी अनेक रेल्वेगाडय़ांमध्ये वैद्यकीय सुविधा प्रवाशांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे गंभीर आजाराने ग्रस्त प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. नागपूर-मुंबई दूरान्तो एक्सप्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली होतीे, परंतु आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नसल्याचे सांगत काही महिन्यांनी त्या डॉक्टरला काढून घेण्यात आले आहे.
रेल्वेच्या वैद्यकीय नियमानुसार प्रवाशांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने देखील लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाडय़ांमध्ये तातडीची वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले. शिवाय रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेगाडीत प्रवाशांना प्राथमिक उपचार मिळण्याची व्यवस्था असल्याची माहिती राज्यसभेत दिली, परंतु रेल्वे प्रवाशांचा वेगळाच अनुभव आहे. अनेकदा त्यांच्यापर्यंत तिकीट तपासणीस पोहोचत नाही, तर वैद्यकीय सुविधा पोहचत असेल यावर कुणाचाही विश्वास बसत नाही.
राज्याच्या उपराजधानीच्या नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर चोवीस तास डॉक्टर उपलब्ध होऊ शकले नाही. मुंबई दूरान्तोमध्ये एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली होती. आता गाडीतील वैद्यकीय सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या निधीतून २०१३ ला एक रुग्णवाहिका रेल्वेला देण्यात आली होती. ही रुग्णवाहिका रेल्वेस्थानकावर उभी राहील आणि प्रथमोचारानंतर तातडीने रुग्णालयापर्यंत पोहचता येईल, असा हेतू यामागे होता, परंतु डॉक्टर आणि परिचारिकेच्याअभावी ही रुग्णवाहिका रेल्वेस्थानकावर ठेवण्यात येत नाही.
रेल्वेस्थानकावरील वैद्यकीय सुविधांकडील त्रुटीकडे गेल्या महिन्यात घडलेल्या एका घटनेने लक्ष वेधले गेले. फूट ओव्हर ब्रिजवरून चालताना एका प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागले. त्याला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. रेल्वेस्थानकावर डॉक्टर उपलब्ध असता तर जीव वाचला असता, वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मरण पावलेले संपतराज कोटेचा यांच्या कुटुंबीयांनी केला होता. कुटुंबीयांनी २७ जानेवारीला रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे तक्रार नोंदवली आहे.
लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये ‘प्राथमिक उपचार पेटी’ दिली जाते. या पेटीत आवश्यक औषधे आणि मलमपट्टी करण्याचे साहित्य असते. तसेच विविध प्रकारची औषधे असतात. राजधानी- शताब्दी या रेल्वेगाडीचे अधीक्षक किंवा काही गाडय़ांच्या गार्ड्सकडून ही औषधे पुरविण्यात येतात. प्राथमिक उपचार करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. रेल्वेने प्रवास करत असलेल्या डॉक्टरांची सेवा देखील घेण्यात येते. एखाद्या प्रवाशाची अचानक प्रकृती ढासळल्यास थांबा नसलेल्या स्थानकावर देखील गाडी थांबवली जाऊ शकते. देशातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावर डॉक्टर उपलब्ध केले जातात. स्टेशन मास्टरकडे जवळपासच्या डॉक्टरांची, सरकारी आणि खासगी रुग्णालयाची सविस्तर माहिती असते. आपात्कालीन स्थितीत ते संबंधित डॉक्टरांना किंवा रुग्णालयाची सेवा प्रवाशांना पुरविण्यास मदत केली जाते, असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

वैद्यकीय सेवेसाठी १३८
धावत्या गाडीत वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी १३८ या क्रमांकाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधता येते. मोबाईलवरून हा क्रमांक डायल केल्यास प्रवाशाला तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जाऊ शकते. प्रत्येक गाडीमध्ये प्राथमिक उपचार पेटी आणि प्रशिक्षित कर्मचारी असतो, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.