‘एफडीए’कडून पाच लाखांचा औषधसाठा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) भंडारा जिल्ह्य़ातील साकोली तालुक्यातील पिंकेपार येथे वसंत विश्वनाथ बाळबुधे या तोतया डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा मारला. त्यावेळी संबंधिताकडे एकाच वर्षांतील पाच वेगवेगळ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्या सापडल्या. पथकाला दवाखान्याला लागून अवैध औषध दुकान आढळले असून तेथील सुमारे पाच लाखांचा औषधसाठा जप्त करण्यात आला.

वसंत बाळबुधे काही दिवसांपासून पिंकेपार या गावात तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे सांगून दवाखाना चालवत होता. रोज त्याच्याकडे विविध आजाराच्या रुग्णांची उपचाराकरिता गर्दी असायची. मध्यंतरी एक गरोदर महिला त्याच्याकडे उपचाराला आली. ती महिला व तिच्या पोटातले बाळ दगावले. याबाबत गदारोळ झाल्यानंतर रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर मुख्यालयात एक तक्रार आली. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांच्या आदेशावरून एका पथकाने दवाखान्यावर छापा टाकला. डॉक्टरची कागदपत्रे तपासली असता त्याच्याकडे २००६ या एकाच वर्षी उत्तीर्ण केलेले औषध निर्माण शास्त्र या विषयासह आयुर्वेद, इलेक्ट्रोपॅथी, होमिओपॅथी, नॅचेरोपॅथी अशा एकूण ५ वैद्यकीयशी संबंधित अभ्यासक्रमाच्या पदव्या आढळल्या. त्या बिहारमधील रांचीसह विविध ठिकाणच्या आहेत.

एफडीएकडून पोलिसांत तक्रार देऊन बाळबुधेकडे एकाच वर्षांत इतक्या पदव्या आल्या कशा? याचा शोध सुरू झाला आहे. पथकाला दवाखान्याला लागून असलेल्या औषध दुकानाचा परवाना ईश्वर गडेकर यांच्या नावावर दाखविण्यात आल्याचे आढळले. गडेकर यांच्या परवान्याचा आधार घेऊन सुरू असलेले हे औषध दुकानही बनावट असल्याचे पुढे आले. येथे पाच लाखांची औषधे असून काही साठा मुदतबाह्य़ झाल्याचे आढळताच सगळा साठा जप्त करण्यात आला. कारवाईत भंडारा येथील औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त पुष्पहास बल्लाळ, गोंदिया येथील औषध निरीक्षक मनीष गोतमारे, प्रशांत रामटेके यांनी सहकार्य केले. कारवाईला दुजोरा देत सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी एकाच व्यक्तीकडे आढळलेल्या पदव्यांचीही पडताळणी सुरू असल्याचे सांगितले.