२५ दिवसांत १४ छापे; ३४ आरोपींना अटक

नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने (औषध) गेल्या २५ दिवसांमध्ये जिल्ह्य़ातील विविध भागात स्थानिक पोलिसांसह इतर विभागांच्या मदतीने १४ ठिकाणी छापेमारी केली. त्यात ५२ रेमडेसिविरचे इंजेक्शन जप्त करण्यात आले असून ३४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील काही कारवाईत रेमडेसिविरच्या काळाबाजारीत डॉक्टर, परिचारिकांसह काही आरोग्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग आढळल्याचा दावा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आला आहे.

नागपुरात करोनाचा उद्रेक सुरू झाल्यावर अत्यवस्थ रुग्ण वाढले. त्यामुळे अचानक रेमडेसिविर इंजेक्शनसह इतरही औषधांची मागणी वाढली.  साठा कमी असल्याने  तुटवडा सुरू झाला. त्याचा लाभ घेत जिल्ह्य़ातील काही असामाजिक तत्त्वांनी  काळाबाजार सुरू केला. त्यामुळे गंभीर संवर्गातील करोनाग्रस्तांना ९०० ते ३ हजार रुपये दराने मिळणारे रेमडेसिविर तब्बल २५ ते तीस हजारांमध्ये खरेदी करावे लागले. हा प्रकार पुढे आल्यावर प्रशासनाने औषध दुकानातून रेमडेसिविरच्या विक्रीवर बंदी आणत थेट कोविड रुग्णालयात पुरवठा सुरू केला. जिल्हा प्रशासनाने अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांच्या मदतीने विविध भागात छापेमारी केली. त्यात ५२ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. दरम्यान, औषध निरीक्षक श्रीमती  धवड यांनी वाडी पोलीस ठाणे हद्दीत धन्वंतरी औषधालयात २२ एप्रिलला छापा मारला. येथे जास्त दराने औषध विक्री होत असल्याचे पुढे आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला. औषध निरीक्षक श्रीमती ताजी यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत २६ एप्रिलला मे. सचिन मेडिकल स्टोर्समध्ये छापा मारला. येथेही नारकोटिक औषधांची विक्री विनादेयकाने केली जात होती. येथे सर्व औषधे जप्त करण्यात आली. इतरही औषध दुकानात या काळात छापे मारून तपासणी केली गेली. जास्तच नियम मोडणारे वाडीतील धन्वंतरी औषधालय आणि इंदोरा चौकातील मे. अजय मेडिकल स्टोर्स येथील खरेदी-विक्री बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सहाय्यक आयुक्त डॉ. पी. एम. बल्लाळ यांनी दिल्याचेही प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आले.