05 July 2020

News Flash

विलगीकरण केंद्रातील डॉक्टरांनाही विश्रांती मिळणार!

करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या मेयो रुग्णालयात सुरुवातीला १४ दिवस सेवा दिलेल्या डॉक्टरला ७ दिवस विश्रांती दिली जात होती.

(संग्रहित छायाचित्र)

आरोग्य विभागाला उशिरा सुचले शहाणपण; लोकसत्ताच्या वृत्ताची प्रशासनाकडून दखल

नागपूर :  विलगीकरण केंद्रात कार्यरत काही डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारीही करोनाबाधित आढळल्यानंतर विलंबानेच का होईना आरोग्य विभागाला जाग आली असून येथील डॉक्टरांना सात दिवस सेवा व तेवढीच विश्रांती दिली जाणार आहे. डॉक्टरांच्या नियुक्तीपासून त्यांना विश्रांतीच दिली नसल्याचा प्रकार पुढे लोकसत्ताने आणला होता, हे विशेष.

करोनाबाधित रुग्णाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या व्यक्तींना खबरदारी म्हणून विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रशासनने आमदार निवास, सिम्बॉसिस, व्ही.एन.आय.टी., वनामती, रविभवन, लॉ कॉलेज चौक, पाचपावली, शहरातील चार हॉटेल्स आणि इतर काही ठिकाणी सोय केली आहे. प्रत्येक केंद्रात तपासणी करण्यासाठी १ ते २ डॉक्टर, इतर  कर्मचारी आहेत. येथे सकारात्मक आलेल्या बाधितांना  मेडिकल, मेयो अथवा एम्स या रुग्णालयात हलवले जाते. वैद्यकीय तपासणीदरम्यान विलगीकरण केंद्रातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी येथे बाधितांच्या संपर्कात येतात. नुकतेच आमदार निवासातील विलगीकरण केंद्रात प्रथम एका महिला डॉक्टरला आणि त्यानंतर एका पुरुष डॉक्टरसह आरोग्य कर्मचाऱ्याला बाधा झाली. त्यांनी विशेष काळजी घेतल्याचा आरोग्य विभागाचा दावा असला तरी त्यावर प्रश्न उपस्थित झाले होते. विश्रांती मिळत नसल्याने डॉक्टरांमध्येही नाराजी होती. शेवटी लोकसत्ताच्या वृत्ताची दखल घेत आरोग्य विभागाने सोमवारी या डॉक्टरांना सात दिवस सेवा आणि सात दिवस विश्रांती देण्याच्या नियोजनावर काम सुरू केले आहे. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाकडे जिल्ह्य़ांत डॉक्टर कमी असल्याने त्याची अंमलबजावणी होणार कधी, हा मोठा प्रश्न आहे.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलुकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी मात्र याबाबत नियोजन सुरू असून डॉक्टरांची उपलब्धता बघून त्यावर अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले.

मेयोत डॉक्टरांना १० दिवस काम केल्यावर विश्रांती

करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या मेयो रुग्णालयात सुरुवातीला १४ दिवस सेवा दिलेल्या डॉक्टरला ७ दिवस विश्रांती दिली जात होती. मेडिकलमध्येही जवळपास हाच नियम होता. परंतु मेयो रुग्णालयात सोमवारपासून नवीन नियमावर काम सुरू झाले आहे. त्यानुसार आता डॉक्टरांना १० दिवस सेवा दिल्यावर काही दिवसांची विश्रांती दिली  जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 2:34 am

Web Title: doctors center rest health care centre department loksatta news akp 94
Next Stories
1 अकोला, अमरावतीचा मृत्यूदर कमी करण्याचा निर्धार
2 परप्रांतीय कामगारांना परत आणण्याची जबाबदारी उद्योजकांनी घ्यावी – गडकरी
3 गरिबांना धान्य संचाऐवजी ५ किलो तांदूळ
Just Now!
X