सुपर स्पेशालिटीतील डॉक्टरचे चित्रफीत व्हायरल

नागपूर : मेडिकलशी संलग्नित सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील हृदय शल्यक्रिया विभागातील एका डॉक्टर जेनरिक औषध नाकारून ‘ब्रांडेड’ औषधींसाठीच आग्रह धरत असल्याचे एक चलचित्र समाज माध्यमावर व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयात पुरेसा औषध साठा असताना डॉक्टरांकडून असे प्रकार घडत आहेत.

मध्य भारतातील हृदयाच्या गरीब रुग्णांवर उपचारासाठी सुपर स्पेशालिटी हे एकच शासकीय रुग्णालय आहे. बीपीएल आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णांना येथे मोफत औषध मिळायला हवे. परंतु शासनाने औषध खरेदीचे अधिकार हाफकीनला दिल्यापासून येथे औषधांचा तुटवडा असतो. त्यामुळे डॉक्टर नातेवाईकांना बाहेरून औषध आणायला सांगतात.

येथील हृदय शल्यक्रिया विभागात दाखल रिताबाई कटारे यांना डॉ. कुणार रावेकर यांनी औषध बाहेरून आणायला सांगितले. पैसे वाचावे म्हणून नातेवाईकांनी जेनरिक औषधे आणली. परंतु डॉक्टरांनी हे औषध नाकारून विशिष्ट दुकानातून ब्रांडेड औषधेच आणायला सांगितली.  जेनरिक औषध निकृष्ट असल्याचे सांगत ब्राँडेड औषधाला लक्स साबणाची उपमा देण्यात आली.

याबाबतचे चिलचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. सुपरचे विशेष कार्य अधिकारी डॉ.मिलिंद फुलपाटील यांनी डॉ. रावेकर याला फटकारत कारणे दाखवा नोटीस बजावली.

‘एमसीआय’च्या निकषांना बगल

भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय)च्या निकषानुसार प्रत्येक डॉक्टरांनी त्यांच्याकडे उपचाराला येणाऱ्या रुग्णांना जेनेरिक औषधेच लिहून द्यायला हवी. याबाबत २१ एप्रिल २०१७ रोजी देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये, वैद्यकीय शिक्षण खात्यांना पत्र पाठवलेआहे. परंतु सुपर स्पेशालिटीतील डॉक्टर या निकषांना बगल देत आहेत.

‘‘संबंधित डॉक्टरला कडक शब्दात समज देत चौकशी समिती नियुक्त केली आहे. डॉक्टर दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.’’

– डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.

‘‘ जेनेरिक औषध नाकारणे चुकीचे आहे. इतर डॉक्टरांनी हे धाडस करू नये म्हणून हे प्रकरण राष्ट्र निर्माण संघटनेकडून पुढे नेण्यात आले आहे.’’

– नीलेश नागोलकर, सचिव, राष्ट्र निर्माण संघटना.