नागपूरच्या रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

नागपूर : कोरडय़ा विहिरीत काम करत असताना बालाघाटच्या तरुणाचा तोल गेला आणि तो थेट खोल कोरडय़ा विहिरीत पडला. खाली कोसळताच विहिरीत असलेल्या दोन लोखंडी सळई त्याच्या शरीरात शिरल्या. त्यातील एक त्याच्या डोक्याचे आवरण भेदून निघाली तर दुसरी डाव्या हातातून आरपार निघाली. मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या त्या तरुणावर योग्यवेळी नागपूरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना तेथील स्थानिक संजय बाहे या तरुणासोबत घडली. संजय मंगळवारी विहिरीत असलेल्या पंपाच्या दुरुस्तीचे काम करत होता. अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट विहिरीत कोसळला. विहिरीत असलेल्या दोन लोखंडी सळई त्याच्या शरीराला भेदून दुसऱ्या बाजूने बाहेर निघाल्या. नागरिकांनी त्याला बाहेर काढले. तेथून थेट त्याला गोंदियाच्या बी.जी. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यांनी नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. विशेष म्हणजे, संजयच्या डोक्यात सळई कायम होती आणि तो शुद्धीवर देखील होता. घटना घडल्यानंतर संजयच्या शरीरातून बराच सक्तस्राव झाल्याने सुरुवातीला काही चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर डॉ. गिरी यांच्या नेतृत्वात भुलतज्ज्ञ डॉ. शिवाजी देशमुख, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. योगेश देशमुख, शल्यचिकित्सक डॉ. कन्हैया चांडक, इंटेसिव्हिस्ट डॉ. सुशांत अदमन, डॉ. तुषार येलने यांच्या चमूने संजयवर यशस्वी शस्त्रक्रिया करत डोक्यात घुसलेली सळाख बाहेर काढली.  डॉ. गिरी म्हणाले, वैद्यकीय परिभाषेत याला पेन्रिटेटिंग इंजुरी ऑफ ब्रेन स्कल म्हणतात. ही करताना डोक्याच्या कवटीचे आवरण काढले जाते. साधारणपणे अशा शस्त्रक्रिया युद्धभूमीवरील सैनिकांच्या केल्या जातात. संजयच्या डोक्यात घुसलेली सळाख गंजलेली होती. त्यामुळे जंतूसंसर्गाची जोखीम पाहता ही शस्त्रक्रिया करताना गुंतागुंत होती. सुदैवाने मेंदूला रक्तपुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनी सुरक्षित होती. शिवाय रुग्ण  शुद्धीवर होता.