महेश बोकडे

सरकारी रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी येथील ३५ खासगी रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांवर उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र या रुग्णालयांमधील डॉक्टरांची संख्या पाहता बाधितांना उपचार कसा मिळणार, हा प्रश्न आहे. कारण करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सना मुंबई आणि पुण्यात तुलनेत दुप्पट वेतन मिळत असल्याने येथे फारच थोडे डॉक्टर्स उपलब्ध असल्याचे दिसते.

येथील खासगी रुग्णालयांत डॉक्टरांपासून परिचारिका, मदतनीस यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचारी दुप्पट वेतन देण्याच्या अटीवर सध्या सेवा देत आहेत. मुंबई, पुणे येथे रुग्ण वाढल्याने तेथील रुग्णालये येथील डॉक्टरांना आणखी जास्त वेतन देण्याचा प्रस्ताव देतात. त्यामुळे जोखीम घ्यायचीच आहे, तर अधिक पगारही मिळावा म्हणून अनेक डॉक्टर मुंबई आणि पुण्याला जाऊन सेवा देणे पसंत करत आहेत.  नागपुरात रोज एक ते दीड हजार रुग्णांची भर पडत आहे. शासनाने नागपूरच्या मेडिकल, मेयो, एम्स या तीन शासकीय रुग्णालयांत स्वतंत्र कोविड रुग्णालये सुरू केली असून येथे सुमारे १ हजार २५० खाटा उपलब्ध आहे. परंतु त्यातील बऱ्याच खाटा सारी आणि करोना संशयित रुग्णांसाठी असल्याने येथे प्रत्यक्षात ३०० ते ४०० खाटात गंभीर बाधितांसाठी उपलब्ध आहे. याशिवाय शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनचीही सोय नसल्याने गंभीर रुग्ण ठेवता येत नाहीत. त्यामुळे महापालिकेने सुमारे ३५ खासगी रुग्णालयांत उपचाराची सोय केली.

रुग्णालयांना चिंता..

नागपुरात सुमारे ६५० खासगी रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये सुमारे १० हजार खाटा आहेत. येथे  नागपूरसह विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथून रुग्ण उपचाराला येतात. त्यासाठी रुग्णालयांत ६०० च्या जवळपास कायम तर २ हजार तज्ज्ञ डॉक्टर सेवा देतात. सुमारे १५ हजार परिचारिका सेवा देतात. एकूण ३५ रुग्णालयांत करोनाबाधितांवर उपचाराला मंजुरी आहे. परंतु बरेच डॉक्टर मुंबई, पुण्यातील जास्त वेतनाचा प्रस्ताव स्वीकारत असल्याने येथील रुग्णालयांची चिंता वाढली आहे.

पुणे : राज्यात मुंबई वगळता अन्य सर्व ठिकाणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना अत्यल्प विद्यावेतन दिले जाते. उदाहरणार्थ मुंबईतील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना तब्बल ५० हजार रुपये विद्यावेतन असताना राज्यातील इतर ठिकाणी करोना रुग्णसेवा करणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मात्र निम्मे विद्यावेतनच दिले जाते. मुंबई आणि राज्यातील इतरत्र ठिकाणच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनाही करोना रुग्णसेवा करताना सारखीच जोखीम पत्करावी लागते, मग हा दुजाभाव का याबाबत प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेने वेळोवेळी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला निवेदन देऊनही त्याकडे सरकारने लक्ष दिलेले नाही.

खासगी रुग्णालयांचा वेतनावरील खर्च दुप्पट झाला असून येथील डॉक्टर जास्त वेतनासाठी मुंबई, पुण्याला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. उपचार करणाऱ्यांपैकी बरेच जण संक्रमितही होत असून त्यांच्या उपचाराचाही खर्च रुग्णालयांना उचलावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने निश्चित केलेल्या दराबाबतही विचार करण्याची गरज आहे.

– डॉ. अशोक अरबट, अध्यक्ष, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन.