News Flash

‘एमसीआय’च्या पत्राने डॉक्टरांना धडकी

मेडिकल आणि मेयोच्याही काही वरिष्ठ डॉक्टरांवर अशाच प्रकारे ठपका ठेवण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अप्रशिक्षित ठरविल्याने कारवाईची शक्यता * मेडिकल, मेयो, सुपरची रुग्णसेवा बाधित होण्याचा धोका

भारतीय वैद्यक परिषदेच्या (एमसीआय) पथकाने केलेल्या पाहणीत नागपूरच्या मेडिकल, मेयो, सुपर स्पेशालिटीतील काही डॉक्टरांना त्यांची शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या आधारावर अप्रशिक्षित ठरविण्यात आले आहे. यासंदर्भातील पत्र संस्थांना प्राप्त झाले असून त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान असे झाले तर सुपर व मेडिकलमधील मूत्रपिंड, गॅस्ट्रोइंट्रोलॉजीसह इतर काही विभागातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याचा धोका आहे.

एमबीबीएस व पदव्यूत्तरच्या अभ्यासक्रमाला मान्यता देण्याकरिता मेडिकल, मेयो आणि सुपरस्पेशालीसह विविध वैद्यकीय संस्थेची एमसीआयच्या पथकांकडून नियमित पाहणी केली जाते. ती करताना विविध निकषांची पूर्तता, शिक्षकांची शैक्षणिक अर्हता आणि अनुभवही पाहण्यात येतो.  या आधारावर एमसीआय पथकाने सुपर स्पेशालिटीतील गॅस्ट्रोइंट्रोलॉजी, मूत्रपिंड विभाग, भूलरोग विभागातील काही डॉक्टरांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर अप्रशिक्षित ठरविले. मेडिकल आणि मेयोच्याही काही वरिष्ठ डॉक्टरांवर अशाच प्रकारे ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटीतील गॅस्ट्रोइंट्रोलॉजीसह मेडिकलच्या काही विभागातील पदव्युत्तरच्या जागांची मान्यता रद्द झाली आहे.

मेडिकल आणि सुपरच्या काही वरिष्ठ डॉक्टरांची शिक्षक म्हणून पुरेशी सेवा झाली नसताना त्यांना प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे तसेच काही प्रकरणात आवश्यक शिक्षण व अनुभव नसतानाही संबंधित शिक्षकाची नियुक्ती झाल्याचे आढळून आले आहे. या डॉक्टरांच्या भरोशावर सुपर स्पेशालिटी व मेडिकलच्या बऱ्याच रुग्णसेवा सुरू आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास येथील मूत्रपिंड विभाग, गॅस्ट्रोइंट्रोलॉजी विभागासह इतर बऱ्याच विभागातील सेवा प्रभावित होण्याच्या शक्यता आहे. सुपरच्या भूलरोग विभागातील एक प्राध्यापकही या पद्धतीमुळे अडचणीत आले आहे.

‘‘एमसीआयने काही अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभवासह इतर अर्हतेवर बोट ठेवत त्यांना अप्रशिक्षित असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यावर प्रशासनाकडून उत्तर देण्यात आले आहे. या विषयावर वैद्यकीय संचालक कार्यालयालाही सल्ला मागण्यात आला आहे. प्रशासनाकडून नियमानुसार कारवाई केली जाईल.’’ 

– डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2017 12:33 am

Web Title: doctors shock by letters issued by medical council of india
टॅग : Doctor
Next Stories
1 विचारसरणीच्या तळाशी अर्थविषयक जाणिवेचा गाभा महत्त्वाचा – गिरीश कुबेर
2 सरकारी रुग्णालयात आधुनिक सेवा देणे अशक्य
3 देशातील पहिली हेल्थ मेडिसिटी नागपुरात
Just Now!
X