खासगी रुग्णालयांचीही सेवा बंद; तिसऱ्या दिवशीही रुग्णांचे हाल

मेडिकल, मेयोत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सामूहिक रजा आंदोलनातील ४४० निवासी डॉक्टरांना बुधवारी निलंबित करण्यात आले. त्यावर संतप्त होत आंतरवासीता (प्रशिक्षणार्थी) डॉक्टरांसह ‘आयएमए’नेही आंदोलनात उडी घेतली. त्यामुळे शासकीय रुग्णालयाचे व्यवस्थापन कोलमडले असतानाच ‘आयएमए’च्या ३ हजार ५०० खासगी डॉक्टरांनीही बुधवारपासून बाह्य़रुग्ण सेवा बंद ठेवली. त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल झाले. ‘आयएमए’कडून गुरुवारीही बाह्य़रुग्णसेवा बंदची हाक देण्यात आल्याने रुग्णांच्या मनात धडकी भरली आहे.

राज्यभरात निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासह मेडिकल व मेयोतील डॉक्टरांना पर्याप्त सुरक्षा मिळावी, या मागणीकरिता गेल्या तीन दिवसांपासून निवासी डॉक्टरांचे नागपुरात सामूहिक रजा आंदोलन सुरू आहे. त्यामुळे येथील रुग्णसेवा कोलमडली असून बुधवारीही शहरातील दीडशेवर किरकोळ व इतर संवर्गातील शस्त्रक्रिया स्थगित होण्यासह क्ष-किरणशास्त्र विभागातील रुग्णांच्या अनेक तपासणीचे अहवाल खोळंबले.

रुग्णांचे हाल बघत वैद्यकीय संचालकांच्या सूचनेवरून रुग्णालय प्रशासनाने रजेवरील निवासी डॉक्टरांना मंगळवारी रात्री नोटीस बजावत बुधवारी सकाळी ८ पर्यंत कामावर रूजू होण्याची नोटीस बजावली होती.

आंदोलकांनी प्रतिसाद न दिल्याने दोन्ही संस्थेतील ४४० निवासी डॉक्टरांना सकाळी ११ वाजता निलंबित करण्यात आले. त्यात मेडिकलच्या ३४५ पैकी ३१० तर मेयोतील १३७ पैकी १३० डॉक्टरांचा समावेश होता. या निर्णयावर संतप्त होत मेडिकलमधील सुमारे २०० व मेयोतील सुमारे १०० आंतरवासीता डॉक्टरांनीही बुधवारी दुपारपासून सामूहिक रजा आंदोलनात उडी घेतली. आधीच कोलमडलेल्या व्यवस्थेत हे डॉक्टरही काम सोडून गेल्याने रुग्ण वाऱ्यावर असल्याचे चित्र होते. डॉक्टरांच्या निलंबनावर इंडियन मेडिकल असोसिएशननेही (आयएमए) संतप्त होत बुधवारपासून बाह्य़रुग्ण सेवा बंद करत केवळ अत्यावश्यक सेवा देण्याचे जाहीर केले. त्यामुळे शहरातील बहुतांश बाह्य़रुग्ण सेवा देणाऱ्या खासगी दवाखान्यांना बुधवारी कुलूप होते.

आयएमएच्या आंदोलनामुळे शहरातील ६५० खासगी रुग्णालयांत केवळ अत्यावश्यक रुग्णांनाच सेवा दिली जात असल्याने सामान्य रुग्णांचे हाल झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकलच्या बाह्य़रुग्ण विभागात बुधवारी २ हजार ८४३ रुग्णांवर उपचार झाले असून १२० रुग्णांना उपचाराकरिता दाखल करण्यात आले. येथे केवळ ६२ शस्त्रक्रिया झाल्या असून ही संख्या नेहमीच्या संख्येहून फार कमी आहे. मेयोतही फार कमी रुग्णांच्या नोंदी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, शहरात शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचा तुटवडा व खासगी दवाखान्यांना टाळे असल्याने रुग्ण ओळखीच्या डॉक्टरांचा शोध घेत विविध भागात फिरत असल्याचे चित्र होते.

परिचारिका विलंबाने येत असल्याचे उघडकीस

प्रशासनाने मेडिकलच्या रजेवरील निवासी डॉक्टरांना रूजू होण्याकरिता बुधवारी सकाळी ८ वाजताची अंतिम वेळ दिल्याने सकाळी ७ पासून अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्यासह सगळेच प्रशासकीय अधिकारी रुग्णालयात पोहोचले. याप्रसंगी निवासी डॉक्टर हजर झाले नसतानाच मेडिकलच्या परिचारिकाही सकाळी ८ वाजताच्या ऐवजी ९.३० ते १० पर्यंत हजर होत नसल्याचा प्रकार पुढे आला. तेव्हा या परिचारिकांना प्रशासनाने चांगलेच खडसावले असले तरी त्यांच्यावर कारवाई होणार काय? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शासनावरच हल्ले व्हायला हवे

आयएमए

शासकीय रुग्णालयांत वर्ग १ ते ४ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा, विविध तपासण्यांची सोय नसणे, औषधांसह साहित्यांचा तुटवडा, सेवेवर वरिष्ठ डॉक्टर नसणे या सर्वासाठी शासन जबाबदार आहे. मात्र रुग्णालयातील गैरसोयीवरचा राग रुग्णांचे नातेवाईक निवासी डॉक्टरांवर काढतात. खरे तर त्यांनी शासकीय यंत्रणेवर आपला संताप व्यक्त करावा. निवासी डॉक्टरांचे आंदोलन त्यांना सुरक्षा मिळावी म्हणून आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे हे चुकीचे आहे. उच्च न्यायालयानेही या प्रकरणात शासनाने सुरक्षेसंबंधित दिलेल्या प्रतीक्षापत्राचे पालन न झालेल्या बाबीवरही लक्ष देण्याची गरज आहे, परंतु डॉक्टरांवर एकतर्फी रोष व्यक्त करणे योग्य नाही. एखाद्या न्यायाधीशाला मारहाण झाल्यास त्यांनाही सुरक्षेशिवाय सेवा देणे शक्य होत नाही. ही बाब डॉक्टरांवरही लागू होते. डॉक्टरांच्या या आंदोलनाला समर्थन देत आयएमएचे सगळे सदस्य बुधवारपासून केवळ अत्यावश्यक वगळता सेवा देत बाह्य़रुग्ण सेवा बंद करत आहे. निवासी डॉक्टरांचे आंदोलन स्थगित झाल्यावरही गुरुवारी खासगीच्या बाह्य़रुग्णसेवा बंद राहतील, अशी माहिती आयएमएचे डॉ. अशोक आढव यांनी दिली. पत्रकार परिषदेला डॉ. मिलिंद माने, डॉ. अविनाश वासे, डॉ. अर्चना कोठारीसह बरेच मान्यवर उपस्थित होते.

रुग्णसेवेवर परिणाम नाही

डॉ. निसवाडे

मेडिकलच्या ३१० निवासी डॉक्टरांना बुधवारी निलंबित केले. येथे सध्या आरोग्य सेवेतील शिक्षण घेणारे ७० निवासी डॉक्टर, सुमारे ३९० शिक्षक, ७० वरिष्ठ निवासी डॉक्टर सेवेवर असून ते चांगल्या सेवा २४ तास देत आहेत. त्यामुळे येथील शस्त्रक्रिया स्थगित होत नसून सगळ्या उपचाराच्या प्रक्रिया होत आहे. रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासन पूर्ण काळजी घेत आहे. प्रशासनाने आंदोलन वाढल्यास आरोग्य विभागाला डॉक्टरांची मदत द्यावी म्हणूण विनंती केली असून गरज पडल्यास ती घेतली जाईल, परंतु सध्या रुग्ण सेवेवर परिणाम पडला नसल्याची माहिती, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दिली. मेयो प्रशासनाकडूनही रुग्णसेवेवर परिणाम झाला नसल्याचा दावा करण्यात आला.

मेडिकलमध्ये दोन दिवसांत २४ मृत्यू

निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेमुळे मेडिकलमध्ये सोमवारी सकाळी ८ ते मंगळवारी सकाळी ८ पर्यंत तब्बल १४ मृत्यू होऊन मृत्यूचा टक्का वाढल्याचा प्रकार लोकसत्ताने पुढे आणला होता. मंगळवारी सकाळी ८ ते बुधवारी सकाळी ८ पर्यंत येथे आणखी दहा मृत्यू नोंदवले गेले आहे. तेव्हा दोन दिवसांत तब्बल २४ मृत्यू नोंदवण्यात आल्याने त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मेयोत सुरक्षा रक्षकावरच हल्ला

शहरातील वेश्यावस्तीवर मंगळवारी पोलिसांनी कारवाई केली होती. त्यातील महिलांसह आरोपींना वैद्यकीय तपासणीकरिता पोलिसांनी मेयो रुग्णालयात रात्री आणले होते. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास अचानक काही असामाजिक तत्त्वांनी येथील खासगी सुरक्षार क्षकावर हल्ला केला. त्यावर उपचार करण्यात आले असून त्याने तहसील पोलिसांकडे प्रशासनाच्या सूचनेवरून तक्रार दिली.