दीड कोटीच्या कुंपणभिंतीमुळे समिती चर्चेत; माहितीच्या अधिकारात वार्षिक लेखा अहवाल प्राप्त

हेडगेवार स्मारक समितीत्या अखत्यारितील स्मृती मंदिर परिसरात महापालिका अंतर्गत रस्ते आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यास तयार असली तरी खुद्द समितीची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे त्यांच्या आर्थिक लेखा अहवालातून स्पष्ट होते.  स्मारक समितीची आर्थिक स्थिती लक्षात घेता समिती स्वत: सुरक्षा भिंत व रस्त्याचे बांधकाम करण्यास सक्षम असल्याचे दिसून येते.

संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या स्मृती मंदिर परिसरात सुरक्षा भिंत व अंतर्गत रस्ते बांधण्याकरिता महापालिकेने १ कोटी ३७ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजूर केला. याला नागरी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. नोंदणीकृत नसलेल्या संघाशी संबंधित संस्थेच्या कामावर जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याला विरोध केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

परंतु, दीड कोटींच्या प्रस्तावामुळे वाद निर्माण होऊन संघ व स्मारक समितीला नाहक टीकेला सामोरे जावे लागले. दरम्यान, मून यांनी माहितीच्या अधिकारात सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून हेडगेवार स्मारक समितीचा अहवाल प्राप्त केला. त्यानुसार समितीकडे कोटय़वधींच्या ठेवी आहेत. शिवाय स्मारक समिती इतर संस्थांनाही विविध सामाजिक कार्याकरिता आर्थिक मदत करीत असते. समितीची आर्थिक स्थिती लक्षात घेतली तर स्मृती मंदिर परिसराची सुरक्षा भिंत किंवा अंतर्गत रस्ते बांधण्याचा खर्च ते स्वत:च उचलू शकतात. मात्र, भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेने संघाप्रती अनावश्यक प्रेम दाखवून समितीची अडचण केली. आता समितीनेच पुढे येऊन महापालिकेची मदत नाकारावी, अशी मागणी जर्नादन मून यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली. त्यासंदर्भात संघाचे महानगर संघचालक राजेश लोया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही, तर स्मारक समितीचे माजी उपाध्यक्ष डॉ. रवींद्र जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यानंतर समितीचे पदाधिकारी रवींद्र बोकारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी समितीची भूमिका न्यायालयात मांडण्यात येईल, असे सांगितले.

वार्षिक लेखा अहवाल

डॉ. हेडगेवार स्मारक समितीने लोया बागरी अ‍ॅण्ड कंपनीच्या माध्यमातून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे वार्षिक लेखा अहवाल सादर केला. २०१६-१७ साठी २८ जुलै २०१६ ला सादर करण्यात आलेल्या वार्षिक लेखा अहवालानुसार समितीकडे इमारत निधी २१ कोटी ४ लाख ८९ हजार ८६८ रुपये, इमारत देखभाल व दुरुस्ती निधी २ कोटी २४ लाख ३५ हजार ९०० रुपये, सेवा निधी १ कोटी ५५ लाख ५४ हजार १६१ रुपये आणि विद्या निधी २४ लाख ६८ हजार २५ रुपये आहेत.

समितीकडील ठेवी

जवळपास ९ कोटीच्या मुदती ठेवीशिवाय समितीचे अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, नागपूर नागरिक सहकारी बँक, यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नंदनवन व अंबाझरी येथील शाखांमध्ये खाती असून त्यामध्ये १३ लाख ७ हजार ७८५ रुपये चालू खात्यामध्ये आहेत, तर ८ कोटी ९० लाख ८६ हजार ३१८ रुपये मुदती ठेवी (एफडी) आहेत.