घरगुती वीज ग्राहकांवर ‘महावितरण’चा बोजा; स्थिर आकारात २०० टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावित

महावितरणने विजेच्या स्थिर आकारात तीन वर्षांत ३० ते २०० टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावित केली आहे. या कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठविलेल्या प्रस्तावात औद्योगिक ग्राहकांना कमी तर मध्यम व उच्चश्रेणीतील घरगुती ग्राहकांना जास्त दरवाढ सुचवली आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास आधीच महागाईने त्रस्त नागरिकांवर मोठा बोजा पडणार आहे.

मुंबईचा काही भाग वगळता राज्यात महावितरणच्यावतीने २ कोटी ३० लाखांहून अधिक ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. त्यात १ कोटी ७० लाख घरगुती, १७ लाख व्यावसायिक, ४ लाख औद्योगिक व उर्वरित इतर वेगवेगळ्या संवर्गातील ग्राहकांचा समावेश आहे. नागपूरच्या तीन विभागात ‘एसएनडीएल’, भिवंडी येथे टोरंट या खासगी फ्रेंचायझीकडे वीज वितरणाची जबाबदारी सोपवली आहे. याकरिता केलेल्या करारानुसार या खासगी फ्रेंचायझीला महावितरणकडून वीज घेऊन ग्राहकांनाही उपलब्ध करून द्यायची आहे.

महागाई वाढल्याने उत्पन्न व खर्चात मोठी तफावत झाल्याचे सांगत महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे मोठय़ा प्रमाणावर वीज दरवाढीची परवानगी मागितली. त्यात वीज ग्राहकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या स्थिर आकाराच्या दरातही वाढीचा समावेश आहे.

दरवाढ कुणाला?

ही दरवाढ घरगुती, बिगर घरगुती, सार्वजनिक पाणी पुरवठा, कृषी, औद्योगिक-यंत्रमाग, शासकीय कार्यालयांसह सर्वच वर्गातील वीज ग्राहकांना लागू राहणार आहे. महाराष्ट्रात वीज कंपन्यांकडून घेण्यात येणाऱ्या या स्थिर आकारात सन २०१२ आणि सन २०१५ मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर महावितरणने यंदाच्या प्रस्तावात पुन्हा घरगुती संवर्गातील ग्राहकांना वाढ प्रस्तावित केली आहे.

Untitled-1